Join us

सुटीच्या हंगामात एसटी प्रवासी सुशेगात दररोज ७६४ जादा फेऱ्या, आरक्षणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 21:46 IST

दरवर्षी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते.

मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदाच्या उन्हाळी सुटीच्या हंगामात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले आहे. या कालावधीत नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यांचे आरक्षणही सुरू झाले आहे.दरवर्षी १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी सुट्यांमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेक कुटुंबे गावी जाण्याचा बेत आखतात. या हंगामात रेल्वे आणि खासगी बसनाही प्रचंड गर्दी असते. त्यामुळे पर्यटन आणि आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेसची गरज भासते. यासाठी एसटी महामंडळाने शालेय फेऱ्या रद्द करून लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.१५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने...राज्यभरात रोज सहा हजारांहून अधिक लांब पल्ल्याच्या एसटी बस धावतात. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने राज्यातील विविध मार्गांवर ७६४ जादा फेऱ्यांना मंजुरी दिली आहे. १५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने जादा फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.बुकिंग कसे कराल?

-जादा फेऱ्यांद्वारे एसटी बस दररोज ५२१ मार्गांवर २.५० लाख किलोमीटर अंतर धावतील. त्यामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहराकडे आणि शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

-या गाड्यांचे बुकिंग महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे करता येणार आहे. याशिवाय, राज्यभरातील बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांवरही बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.