Join us

निदान होणा-या आजारांमुळे ७,६५० मुंबईकरांचे मृत्यू

By admin | Published: July 16, 2014 1:06 AM

डेंग्यू, डायरिया, मलेरिया, क्षयरोग व कॉलरा यासारख्या निदान होणाऱ्या आजारांमुळे मुंबईत वर्षभरात ७ हजार ६५० नागरिक मृत्यूमुखी

मुंबई : डेंग्यू, डायरिया, मलेरिया, क्षयरोग व कॉलरा यासारख्या निदान होणाऱ्या आजारांमुळे मुंबईत वर्षभरात ७ हजार ६५० नागरिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्रजा फाऊंडेशनने उघड केली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणी विभागातून ही माहिती मिळवल्याचे संस्थेचे विश्वस्त निताई मेहता यांनी सांगितले.मेहता म्हणाले, ‘२0१३-१४ या आर्थिक वर्षात जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एकूण ८७ हजार २७ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यातील ७ हजार ६५० मृत्यूंचे कारण डेंग्यू, डायरिया, मलेरिया, क्षयरोग व कॉलरा हे आजार असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूमुखींची संख्या ७ हजार १२७ इतकी असून मलेरियामुळे १९९ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र मुंबई महापालिकेने क्षयरोगामुळे १ हजार ३९३ तर मलेरियामुळे केवळ ३० जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती प्रकाशित केली आहे. या तफावतीतून मुंबईत कोणत्या सार्वजनिक आरोग्य योजनांमध्ये कोणत्या सुधारणा करायला हव्यात याविषयीच्या सूचना मिळू शकतात, असे मत मेहता यांनी व्यक्त केले.जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यामुळे सामाजिक-आर्थिक नियोजनासाठी तसेच आरोग्य व्यवस्थेच्या विकासासाठी आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी माहितीचा स्त्रोत निर्माण झाला आहे. मात्र महापालिकेचे अधिकारी या आकडेवारीकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत संस्थेने व्यक्त केली. (प्रतिनिधी)