७६ वा वर्धापन दिन : एसटी स्थानके रांगोळीसह फुला-पानांच्या तोरणांनी सजणार!
By सचिन लुंगसे | Published: May 31, 2024 06:47 PM2024-05-31T18:47:29+5:302024-05-31T18:48:03+5:30
एसटीची सेवा राज्यात देण्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत.
मुंबई : पुणे - अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस १ जून १९४८ रोजी धावली. त्या निमित्ताने १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जात असून, १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी व सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुला पानाचे तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.
एसटीची सेवा राज्यात देण्यासाठी ८७ हजार कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत. ३६ बेडफोर्ड बसवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षात १५ हजार बस पर्यंत पोहोचला आहे. बसच्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनी अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवाशी सेवेमध्ये ३३ टक्कयावरून १०० टक्कयांपर्यंत सवलत दिली जाते.
- गेल्या ७६ वर्षांत एसटी संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाडया वस्त्यांपासून आदिवासी पाडयापर्यत दळणवळण सेवा देत आहे.
- गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष् फेऱ्या सोडून एसटी प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते.
- शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठी देखील एसटी सेवा देत आहे.