मुंबई - मोफत मिळणाऱ्या साडीच्या नादात ७७ वर्षांच्या आजीने ७७ हजार रुपये किमतीचे दागिने गमावल्याची घटना कुरारमध्ये घडली. या प्रकरणी आजीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी ठगांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कुरारगाव परिसरात उज्ज्वला रतन जाधव (७७) या कुटुंबीयांसोबत राहतात. गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास नातीला नर्सरीमध्ये सोडून त्या घराकडे निघाल्या. साडेसातच्या सुमारास त्या दप्तरी रोडने येत असताना, एका इसमाने त्यांना अडविले. पुढे वृद्ध महिलांसाठी मोफत साडीवाटप सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर, रस्त्याकडेला पार्क केलेल्या दोन टेम्पोंच्या मध्ये त्यांना बसविले. त्यांच्या हातात एक प्लॅस्टिकची पिशवी दिली. त्यामध्ये शंभर आणि दोनशे रुपयांची नोट घडी करून दिली. मंगळसूत्र पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांनी ते पर्समध्ये ठेवले. दोघांनीही पिशवीची गाठ मारून देण्याच्या नावाखाली पिशवीची अदलाबदल केली आणि शेठला घेऊन येतो, असे सांगून ते निघून गेले.अर्धा तास होत आला, तरी दोघेही न परतल्याने, त्यांना संशय आला. त्यांनी सामानांची झडती घेतली. तेव्हा त्यामधील पर्स गायबझालेली दिसली. त्यांनी याबाबत मुलाला कळविले. मुलासह कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.सावधान... तुमचीही फसवणूक होऊ शकतेगेल्या काही महिन्यांपासून पश्चिम उपनगरात अशा प्रकारे वृद्धांना टार्गेट केले जात असल्याचा घटना समोर येत आहेत. यामध्ये साडीसह विविध वस्तूंचे आमिष दाखवून वृद्धांच्या दागिन्यांची लूट होत आहे.त्यामुळे तुम्हालाही अशी संशयित व्यक्ती भेटल्यास त्याच्या मोहाला बळी पडू नका. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास माहिती द्या, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
साडीच्या नादात ७७ वर्षांच्या आजीने गमावले ७७ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 5:19 AM