Join us

बारावीचे ७८ टक्के विद्यार्थी म्हणतात , दहावीप्रमाणे बारावीच्या परीक्षा रद्दच करा ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:06 AM

दहावीच्या निर्णयाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करा; शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहावीच्या ...

दहावीच्या निर्णयाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर निकाल जाहीर करा; शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, असे सांगण्यात आले; परंतु बारावीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेली नाही. त्यामुळे बारावीच्या जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार कायम आहे. एका सर्वेक्षणानुसार १ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये बारावीचे जवळपास ७८ टक्के विद्यार्थी हे दहावीप्रमाणे बारावीच्या परीक्षा रद्द व्हाव्यात, अशी मागणी करीत आहेत. तर १० टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा व्हायला हव्यात, असे मत मांडले. या विद्यार्थ्यांपैकी ११ टक्के विद्यार्थी हे संमिश्र पद्धतीने बारावीच्या परीक्षांचे गुणांकन व्हायला हवे, अशी मागणी करीत आहेत.

प्रा. दिनेशकुमार गुप्ता यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना सदर माहिती मिळाली आहे. शासनाने विद्यार्थ्यांची मानसिकता आणि परिस्थिती पाहून लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक करीत आहेत.

बारावीच्या परीक्षेबाबत ठोस निर्णय हाती येत नसल्याने विद्यार्थ्यांचा ताण दिवसागणिक वाढत असल्याचे मत पालक आणि शिक्षकांनी मांडले. सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, उजळणी अंतिम टप्प्यात आहे. असे असताना परीक्षेचे वेळापत्रक हाती असल्यास नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखण्यास मदत होते; पण आता आणखी कितीवेळ परीक्षेची वाट पाहायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांना विविध व्यवसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सहभागी व्हायचे असते आणि नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा त्यांचा मानस असतो. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असते. परीक्षा आणि निकालाला उशीर झाला तर भविष्यातील त्यांच्या प्रवेश परीक्षा आणि त्यानंतरच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. पालकांकडूनही विद्यार्थी याच तणावाखाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने बारावी परीक्षांसंदर्भातला निर्णय मंडळाने वेळेत जाहीर करायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मागील वर्षी असे लांबले शैक्षणिक वर्ष (२०२०-२१)

अभ्यासक्रम : लांबलेले शैक्षणिक वर्ष (महिन्यांमध्ये)

अकरावी : सहा महिने

पदवी (प्रथम वर्ष) : दीड ते दोन महिने

पदव्युत्तर पदवी : तीन ते चार महिने

....................