गेटच्या परीक्षेला ७८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:07 AM2021-02-15T04:07:27+5:302021-02-15T04:07:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नॅशनल को-ऑर्डिनेशन बोर्डाच्या वतीने दरवर्षी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नॅशनल को-ऑर्डिनेशन बोर्डाच्या वतीने दरवर्षी इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली ‘गेट २०२१’ ही कम्प्युटर बेस टेस्ट (सीबीटी) अॅप्टिट्यूड परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी देशभरातून तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ७८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि देशातील सात आयआयटी संस्थांमार्फत गेट परीक्षा घेण्यात येते. यंदा आयआयटी मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या ‘गेट २०२१’ ही परीक्षा ५, ते ७ आणि १२ ते १४ फेब्रुवारी रोजी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये झाली. यंदा परीक्षेत एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या दोन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स हा पेपर इकॉनॉमिक्स, इंग्लिश, फिलॉसॉफी, सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना देता आला. यंदा २७ पेपर असून, ते वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित होते. परीक्षेसाठीची नोंदणी १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन झाली. गेट २०२१ ही परीक्षा देशातील २०० शहरांतील ६१६ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला तब्बल ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७८ टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. हा आकडा गतवर्षीइतकाच आहे. त्यामुळे या परीक्षेवर कोरोनाचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आला नाही. या परीक्षेचा निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर होणार असून, हा निकाल पुढील तीन वर्षे ग्राह्य धरण्यात येणार आहे. गेट २०२१ परीक्षा आयोजित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या समितीचे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषिश चौधरी यांनी अभिनंदन केले.