१० जणांकडे ७८ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी; कर थकवणाऱ्यांची नावे पालिकेकडून जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 07:53 AM2024-03-20T07:53:03+5:302024-03-20T07:53:26+5:30
आर्थिक वर्ष २०२३-२४ संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सर्वाधिक मालमता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांची नावे महापालिकेने जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. १९ मार्च रोजी पालिकेने आणखी १० मोठ्या थकबाकीदारांची यादी नावानिशी जाहीर केली. त्यांच्याकडे ७८ कोटी ६५ लाख ५० हजार ६३१ रुपयांची थकबाकी आहे.
मालमत्ताकर वसुलीच्या अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने आर्थिक क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ता धारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली जात आहे. सरत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने विविध उपाययोजना आखल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी नियोजन करण्यात आले आहे.
मालमत्ता कराचे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस पाठवण्यात आल्यनंतर विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरू आहे. समाजमाध्यमांद्वारे संपर्क करून तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज सुरू आहे. विविध माध्यमातून जनजागृती करून ३१ मार्च २०२४ पर्यंत करभरणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.