Join us  

मोबाइल ॲप प्रकरणी ७८ कोटी रुपये जप्त, ईडीची कारवाई, पाच ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 6:00 AM

मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत सामान्य ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत.

मुंबई : मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या काही कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी छापेमारी करत या कंपन्यांच्या बँक खात्यात असलेली ७८ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. या कंपन्यांची कार्यालये बंगळुरू येथे असून तिथे ही छापेमारी करण्यात आली. 

मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत सामान्य ग्राहकांची पिळवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यांचा तपास विविध राज्यांतील स्थानिक पोलीस,सीबीआय आणि ईडी करत आहे. ईडीने जवळपास ६०० कंपन्यांना यापूर्वीच नोटिसा जारी करत त्यांची छाननी सुरू केली आहे. या छाननीमध्ये जी माहिती मिळत आहे,त्या अनुषंगाने आता ईडीचे अधिकारी कारवाई करीत आहेत. बंगळुरू येथील तीन कंपन्यांवर झालेली कारवाई ही याचाच एक भाग आहे.

उपलब्ध माहितीनुसार,या कंपन्यांचे मूळ मालकही चिनी असल्याचे तपासात आढळून आले. चीनमधील मालकांनी भारतातील काही लोकांच्या कागदपत्रांचा वापर करत भारतातील बंद पडलेल्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसोबत (एनबीएफसी) संधान साधत कर्ज वितरणाचा अवैध धंदा सुरू केला आहे.

तपासादरम्यान जी कागदपत्रे पुढे आली त्यानुसार या कंपन्यांच्या विविध बँक खात्यामध्ये एकूण ७८ कोटी रुपये असल्याचे आढळून आले. गुन्ह्यातील मुद्देमाल म्हणून ईडीने ही रक्कम जप्त केली आहे. शनिवारी छापेमारी करत केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर या कंपन्यांची आजवर एकूण ९५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

टॅग्स :मोबाइलअंमलबजावणी संचालनालय