मुंबई : जोगेश्वरी गुंफेवरील ७८ रहिवाशांचे पुनर्वसन लवकर करण्यात येणार आहे. या ७८ लोकांची लॉटरी तत्काळ काढण्यात यावी, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. १५ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी, असेही ते म्हणाले. जोगेश्वरी गुंफा प्रकल्प येथील बाधित रहिवाशी विस्थापित झाल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी वायकर यांनी बैठक बोलावली होती.७८ लोकांचे पुनर्वसन बोरीवली चिकुवाडी येथे करण्यात येणार आहे. त्यांचे अद्याप पुनर्वसन करण्यात आलेले नाही. ते राहत असलेल्या घराच्या दुरवस्थेतही वाढ झाली आहे. चिकुवाडीतील इमारतींमध्ये विकासकाने कामे अपूर्ण केली आहेत, ती पालिकेने पूर्ण करावी. याकरिता २५ लाखांचा निधीही द्यावा. इमारतीला जलजोडणी दोन दिवसांमध्ये जोडण्यात येईल, असे आश्वासनही आर पूर्व विभागातील जल अभियंत्याने दिले. गुंफेवरील डेब्रीज उचलून तेथे गार्डन उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी सूचनाही वायकर यांनी केली.दरम्यान, मेघवाडी पोलीस चौकी बांधणे व तेथील रहिवाशांचे पुनर्वसन १७ जूनपर्यंत करा, असेही निर्देश वायकर यांनी दिले. येथील ३२ लोकांपैकी १० पात्र लोकांचे जोगेश्वरी येथेच पुनर्वसन करण्यात यावे, अन्य २२ अपात्र लोकांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले़
जोगेश्वरी गुंफेवरील ‘त्या’ ७८ लोकांचे होणार पुनर्वसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:46 AM