७८ टक्के नालेसफाई पूर्ण
By admin | Published: May 26, 2017 12:50 AM2017-05-26T00:50:32+5:302017-05-26T00:50:32+5:30
आगामी मान्सूनमध्ये रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी मान्सूनमध्ये रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेच्या वतीने रेल्वे हद्दीतील ७८ टक्के नालेसफाई पूर्ण करण्यात आली असून मध्य रेल्वेने ९० हजार मीटर नाल्यांची सफाई पूर्ण केल्याचा दावा केला आहे. रेल्वे मार्गावरील पाणी साचण्याच्या ठिकाणी परेच्या वतीने ८८ आणि मरेच्या वतीने २३ पंप बसवण्यात येणार आहेत.
मुंबईकरांची लाइफलाइन पावसाळ्यातही सुरळीत राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बहुतांशी कामे मार्गी लागल्याचा दावा केला आहे. या कामांतर्गत रेल्वे रुळावरील साफसफाई, नालेसफाई, पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. उर्वरित सफाईची कामे १ जूनपर्यंत पूर्णत्वास येतील, असा विश्वास परेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाळ्यात रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या नाल्यांची सफाई न झाल्याने पाणी साचते. परिणामी रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेने ९० हजार मीटर नाल्यांची आणि ७६ भूमिगत नाल्यांची सफाई केली असल्याचा दावा केला आहे. महापालिकेने दिलेल्या निधीतून नालेसफाई करण्यात येत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळणारी ६०४ ठिकाणे मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार त्या जागेवर मध्य रेल्वेकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.
पाणी उपसा करण्यासाठी १११ पंप
मध्य रेल्वेवर पाणी साचणारी १९ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. या पाण्याचा निचरा करण्यासाठी २३ पंप ३१ मेपर्यंत बसविण्यात येणार असल्याची माहिती मरेच्या वतीने देण्यात आली. तर पश्चिम रेल्वेच्या निम्नस्तरावरील स्थानकांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी परेने ८८ पंप बसवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाचे नियंत्रण कक्ष
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने स्वतंत्ररीत्या नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मान्सूनमध्ये हे नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. या कक्षात पूर परिसर, हवामान विभाग, आपत्कालीन परिस्थितीतील बचाव दल तैनात करण्यात आले आहे.
पाणी साचणारी ठिकाणे
मध्य रेल्वे : मशीद, माझगाव यार्ड, भायखळा, करी रोड, सायन, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, ठाणे
हार्बर रेल्वे : शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर, चेंबूर
पश्चिम रेल्वे : मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली