मुंबईत फटाक्यांचा आवाज वाढला, नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ७८४ गुन्हे
By मनीषा म्हात्रे | Published: November 13, 2023 07:14 PM2023-11-13T19:14:28+5:302023-11-13T19:15:05+5:30
८०६ जणांवर कारवाई
मुंबई : दिवाळीत फटाके फोडण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलिसांनी ७८४ गुन्हे नोंदवत ८०६ जणांवर कारवाई केली आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्याने उच्च न्यायालयाने दिवाळीत संध्याकाळी ७ ते रात्री १० पर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. या आदेशाचे पालन करण्यात येते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी संबंधित पालिका आयुक्त व पोलिसांवर असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार कारवाई करण्याचा इशारा सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिला. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.
१० ते १२ तारखे दरम्यान मुंबईत ७८४ गुन्हे नोंदवण्यात आले. यामध्ये एकूण ८०६ जणावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ७३४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हीच कारवाई पुढे देखील सुरू राहणार असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.
धनतेरस, नरक चतुर्थी पेक्षा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज वाढला. रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या विविध ठिकाणी फटाके फोडणे सुरू होते. मुंबई पोलिसांच्या अधिकृत 'एक्स'वरील अकाऊंट वर तक्रारीचा सुर वाढलेला दिसला.