मुंबई : मुंबई विद्यापीठाने मे महिन्यात घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील बीएमएस सत्र ६ चा निकाल बुधवारी रात्री जाहीर केला. या परीक्षेत ९,२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.७४ एवढी आहे.२ मे ते ९ मे या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेस १४,१९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १४,१५६ विद्यार्थी परीक्षेस बसले. पैकी ९,२१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यापीठाने हा निकाल ४० दिवसांच्या आत जाहीर केला. या निकालासोबतच आतापर्यंत ८४ परीक्षेचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत.मागील वर्षीही मुंबई विद्यापीठाने बीएमएसचा निकाल वेळेत जाहीर केला होता. या परीक्षेचे मूल्यमापन वेळेवर करण्यात आल्याने निकाल ४० दिवसांच्या आत जाहीर करणे शक्य झाले आहे. याचप्रमाणे इतरही परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यात येत आहेत, असे याबाबत अधिक माहिती देताना परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.बीएमएस हा अभ्यासक्रम महत्त्वाचा असून यातील अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी परदेशी जातात. परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास प्रथम प्राधान्य असून या निकालाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व परीक्षा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना जाते.- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
बीएमएस सत्र सहामध्ये ७८.७४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 4:53 AM