मुंबई - दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील स्थानकांत एकूण ७९ पंप मशीन बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.मध्य रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या होते. सहा ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी तुंबते. या भागातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप मशीनच्या संख्येत वाढ केली आहे, अशी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. परिणामी, प्रवाशांना पायपीट करत इच्छितस्थळी पोहोचावे लागते. वादळवारा आणि पाऊस पडल्यामुळे झाडे पडण्याच्या घटना, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे अशा घटना घडतात. त्यामुळे मान्सूनपूर्व काळात रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, नालेसफाई, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे, रेल्वे मार्गात येणाºया लोखंडी वस्तूंना गंजरोधक रंग लावणे अशी कामे सध्या सुरू आहेत. एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत ७० ते ८० टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत.मध्य रेल्वे मार्गावर मागील वर्षी ५८ पंप मशीन बसविण्यात आल्या होत्या. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या वर्षी ७९ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील मुलुंड, विद्याविहार, कुर्ला, सायन, भायखळा, सॅण्डहर्स्ट रोड, मशीद या स्थानकांजवळ नालेसफाई, रेल्वे रूळ मार्ग सफाईवर जास्त प्रमाणात भर दिला आहे.आपत्कालीन घटनेचा सामना करण्यास प्रशिक्षणआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे, ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळायची याचे प्रशिक्षण सुरक्षा विभागाला देण्यात आले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि इतर सुरक्षा विभाग वाढविण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली या स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे.गर्दीच्या नियोजनावर भरएल्फिन्स्टन (प्रभादेवी) स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना झाली. त्यामुळे या वेळी खबरदारी म्हणून गर्दीचे नियोजन करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे. मान्सून काळात प्रवाशांना एका ठिकाणी उभे राहून गर्दी न करण्याचे आवाहन सुरक्षा विभागाकडून करण्यात आले आहे.पश्चिम आणि मध्य दोन्ही मार्गांवरील स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बल, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस, होमगार्ड व इतर सुरक्षा विभाग तैनात करण्यात येणार आहेत. यासह या सुरक्षा विभागाला मान्सूनकाळासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन घटनेशी कसा सामना करायचा, गर्दीचे व्यवस्थापन आणि पावसाळ्यात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल यांना प्रशिक्षण दिले.
मध्य रेल्वे मार्गावर ७९ पंप उपसणार पावसाचे पाणी! पाणी साचू नये म्हणून उपाययोजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 3:28 AM