मुंबई : कोरोनामुळे सरकारकडून करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान गरजूंना जेवणाची पाकिटे वाटण्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारासह सात जणांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अंधेरीतील सोन्याच्या दागिन्यांच्या कारखान्यात त्यांनी जवळपास ८ कोटी रुपयांचे हिरे आणि दागिने लंपास केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. रेड झोनमध्ये असूनही एमआयडीसी परिसरात बंदोबस्ताची जबाबदारी निभावत गुन्ह्याची उकल केलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या टीमचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे.विपुल चंबरिया, दिमन चौहान, मुन्नाप्रसाद खैरवार, लक्ष्मण दंडू ऊर्फ मच्छी, शंकर येशू, राजेश मार्पक्का आणि विकास चनवादी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यात चौहान हा फिर्यादीच्या कंपनीत स्टॉक होल्डर, तर खैरवार हा घरफोडी करण्यात आलेल्या नीरज इंडस्ट्रियल इस्टेट येथे सुरक्षारक्षक आहे. यातील मुख्य आरोपी चंबरिया हा एकता फाउंडेशन सोसायटी नामक खासगी संस्थेचा अध्यक्ष असून उर्वरित अन्य त्याचे पदाधिकारी आहेत. चंबरिया याला पालिकेकडून लॉकडाउन दरम्यान गरजूंना जेवणाची पाकिटे वाटण्याचे कंत्राट मिळाले होते. त्याचा फायदा उचलत त्याने चौहान आणि खैरवार तसेच अन्य साथीदारांच्या मदतीने राजकुमार लुथरा यांच्या कारखान्यात घरफोडी करण्याचा कट रचला. त्यानुसार ६ एप्रिल, २०२० रोजी कारखान्याचा सिमेंटचा पत्रा तोडून छतामधून आत प्रवेश केला. लोखंडाची तिजोरी ग्रील कटरने कापून त्यातील सोन्याचे दागिने आणि अन्य मुद्देमाल लंपास करत पळ काढला.त्यांनी ७ कोटी ९ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा ऐवज सोबत नेला होता. ज्यातील ५ कोटी ३० लाख १२ हजार ८२३ रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन, कटर हस्तगत करण्यात आले आहेत. संशयितांनी सीसीटीव्ही कॅसेटही चोरून नेल्याने त्यांची ओळख पटविणे मोठे आव्हान होते. मात्र तांत्रिक तपास आणि खबरींचे नेटवर्क तसेच पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा गुन्हा उघडकीस आणल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शिंंदे यांनी सांगितले.
८ कोटींची हिरेचोरी; महापालिकेच्या कंत्राटदाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:31 AM