रेल्वे प्रवासात आठ कोटींच्या सोनसाखळ्यांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:54 AM2019-04-29T04:54:36+5:302019-04-29T04:55:06+5:30
सहा वर्षांतील आकडेवारी; २ हजार ४८ तक्रारी दाखल, पोलिसांकडून ८६० गुन्ह्यांची उकल
मुंबई : लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी. नोकरी, शिक्षण, आप्तेष्टांच्या भेटीगाठी तसेच अन्य कामांसाठी लोकल प्रवासाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच ‘लोकलचा प्रवास आणि गर्दी’ असे जणू समीकरण झाले आहे. याच गर्दीचा फायदा घेत गेल्या सहा वर्षांत उपनगरी रेल्वे प्रवासात तब्बल आठ कोटी रुपयांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दाखल झालेल्या २ हजार ४८ तक्रारींपैकी ८६० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०१३ ते जानेवारी ते डिसेंबर २०१८ सालापर्यंत उपनगरी रेल्वे हद्दीत (मध्य, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्ग) घडलेल्या सोनसाखळी चोरी प्रकरणी २ हजार ४८ तक्रारी दाखल झाल्या. चोरीस गेलेल्या सोनसाखळ्यांची एकूण किंमत ८ कोटी ५६ लाख सात हजार, ५६३ रुपये एवढ आहे. यातील ८६० गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली असून, चोरट्यांना ताब्यात घेत २ कोटी ६७ लाख ८३ हजार ६१९ रुपये किमतीच्या सोनसाखळ्या परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत रेल्वे पोलिसांकडून ही माहिती मिळाली आहे.
चोरीच्या घटनांचा आलेख चढाच असल्याचे उघडकीस
रेल्वे प्रवासात गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी करण्याच्या घटनांत गेल्या सहा वर्षांत वाढ झाली आहे.
299 घटनांची तक्रार २०१३ मध्ये दाखल झाली होती.
334 तक्रारी २०१८ मध्ये दाखल झाल्या.
रेल्वे परिसरात सीसीटीव्हीचे जाळे असतानाही या गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे पोलिसांना म्हणावे तितके यश आले नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
वर्ष | घटना | गुन्ह्यांची उकल | किंमत | परत मिळालेला ऐवज |
२०१३ | २९९ | १६१ | १,२९,२१,८६७ | ४७,५८,९५६ |
२०१४ | ३२७ | १६४ | १,२७,१४,७७७ | ४७,२६,४२६ |
२०१५ | ४०४ | १६३ | १,५९,११,७११ | ५३,७९,०७९ |
२०१६ | ३१७ | १२९ | १,२४,८९,३३३ | ३६,२५,९०८ |
२०१७ | ३६७ | १५० | १,५४,३१,०५३ | ४८,६९,८०७ |
२०१८ | ३३४ | ९३ | १,६१,३८,८२२ | ३४,२३,४४३ |