काम न करताही ८ कोटी रु पयांची बिले मंजूर , सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 03:10 AM2017-08-29T03:10:21+5:302017-08-29T03:10:41+5:30
वरळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, जुन्या वर्क आॅर्डरची बिले अदा न करता, तब्बल ८00 नवीन कामांना मंजुरी देत ८ कोटी रुपयांचा अपहार केल्याबाबत
मुंबई : वरळी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाºयांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, जुन्या वर्क आॅर्डरची बिले अदा न करता, तब्बल ८00 नवीन कामांना मंजुरी देत ८ कोटी रुपयांचा अपहार केल्याबाबत, गंगापूर खुल्दाबादचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब व शासकीय कंत्राटदार एन. पी. शेख यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे.
सविस्तर माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी विभागांतर्गत मुंबईतील सरकारी निवासी व अनिवासी इमारतींची देखभाल केली जाते. या इमारतींच्या दुरुस्तीसाठी उपलब्ध झालेल्या निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने, ३ आॅक्टोबर ते १६ डिसेंबर २0१६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत या विभागात ८ कोटी रुपये किमतीच्या तब्बल ८00 कामांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, कोणत्याही तांत्रिक तपासण्या न करता मंजुरी देण्यात आली. या वरताण म्हणजे, ही ८00 कामे फक्त कागदोपत्री झालेली दाखवून, या कामाची बिलेही तत्काळ अदा करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी मा आमदार बंब यांनी सा. बां. विभागाच्या मुख्य सचिवाकडे केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी शासनाच्या विशेष भरारी पथकाने सुरू केली. भरारी पथकाचे अधिकारी मागील एक महिन्यापासून वरळी तेथे तळ ठोकून आहेत. हे प्रकरण इतके गंभीर असतानाही, तसेच संबंधित भ्रष्ट अधिकारी निलंबनास पात्र असतानाही या प्रकरणाची चौकशी कूर्मगतीने सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.