लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६, ७ एप्रिल रोजी १२ प्रकरणांत एकूण ८ किलो १० ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. या कारवाईदरम्यान सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईविमानतळावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी विशेष लक्ष ठेवून असताना परदेशातून येणारे काही प्रवासी सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार संबंधित विमानांच्या बाहेर अधिकाऱ्यांनी सापळा लावून तस्करांना अटक केली.
कपड्यांमध्ये, बॅगेत तयार केले चोर कप्पे या आरोपींपैकी काहींनी सोने परिधान केले तर काहींनी कपड्यांमध्ये, बॅगेत चोर कप्पे तयार करून त्यात सोने लपविले होते. एका प्रकरणात आरोपीने सोने शरीरात लपविल्याचेही आढळून आले.