लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहिसर (पूर्व) आणि मीरा-भाईंदरदरम्यान धावणाऱ्या १३.५ किमी लांबीच्या मेट्रो - ९ चे काम वेगाने सुरू असून, हा मार्ग तयार झाल्यानंतर येथून दररोज ८ लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.
मेट्रो लाइन ९ वर कार्यरत असलेल्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, दहिसर (पूर्व) आणि मीरा-भाईंदर दरम्यानच्या १३.५ किमी लांबीच्या एमआरटीएस लाइनवर मेट्रो लाइन ९ चे पहिले दोन यू-गर्डर्स त्याच्या उत्तरेकडील भागात यशस्वीरीत्या लाँच केले आहेत. १४३.३९ मेट्रिक टन वजनाच्या २५ मीटर स्पॅनसह, हे यू-गर्डर आकाराने प्रचंड माेठे आहेत. मेट्रो लाइन ९ मधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दररोज ८ लाखांहून अधिक प्रवासी मेट्राेने प्रवास करू शकतील.
दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त आर. ए. राजीव यांनी चारकोप मेट्रो डेपोला भेट दिली. या वेळी झालेल्या बैठकीत मेट्रो लाइन २ अ, चारकोप मेट्रो डेपोमधील मेट्रो प्रकल्पांच्या कामांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
* मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या कामांना वेग
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोंची कामे वेगाने पूर्ण होत असून, या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यात प्रवाशांच्या सेवेत रुजू हाेतील. या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांची साेय हाेईल. तर २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून, त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा प्राधिकरणाचा अंदाज आहे.