मुंबई: गिरगाव चौपाटीवर ‘महाराष्ट्र रजनी’च्या व्यासपीठाला लागलेल्या आगीचा ढिगारा उचलण्यासाठी मुंबई महानगर पालिकेला तब्बल ८ लाख ६ हजार ९५२ रुपये एवढा खर्च आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारन्वये ही माहिती मिळाली आहे.महापालिकेने गिरगाव चौपाटीवर आगीनंतर केलेल्या साफसफाईसंबंधीची माहिती गलगली यांनी विचारली होती. ‘डी’ विभागाच्या घनकचरा खात्याच्या सहायक अभियंत्यांनी संबंधिताला दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी रोजी लागलेल्या आगीनंतर पालिकेने त्वरित येथील साफसफाई हाती घेतली. साफसफाई अंतर्गत ३१५ मेट्रिक टन एवढा ढिगारा उचलण्यात आला. हा ढिगारा उचलण्यासाठी ८ लाख ६ हजार ९५२ रुपये एवढा खर्च आला. ‘डी’ विभागातील यंत्रसामुग्री, वाहने, कामगार आणि अशासकीय संस्थांच्या कामगारांमार्फत हे काम करण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे, या कामाकरिता जो अतिरिक्त खर्च आला आहे, तो भरण्यासाठी पालिकेने कार्यक्रमाचे आयोजक ‘रिजनल डायरेक्टर कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्री’ला कळविले आहे, परंतु आयोजकांकडून पालिकेला अद्याप उत्तर आलेले नाही, तर गलगली यांनी यावर आयुक्त अजय मेहता यांना निवेदन दिले असून, आयोजक अतिरिक्त रक्कम भरत नसतील, तर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
चौपाटीवरील ढिगारा हटविण्यासाठी ८ लाख
By admin | Published: March 04, 2016 3:19 AM