Join us

कांदिवलीतून आणखी ८ बांगलादेशींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 2:02 AM

कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरातून रविवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखीन ८ बांगलादेशींना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरातून रविवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आणखीन ८ बांगलादेशींना बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी दोघांकडे भारतीय पॅन कार्ड, आधार कार्ड एटीएसने जप्त केले आहेत. आठही जणांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.बांगलादेशने बंदी घातलेल्या अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेविरुद्ध, एनआयए, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्य एटीएसने एकत्रितरीत्या मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून भारतात घुसखोरी करून राहत असलेले बांगलादेशी त्यांच्या रडारवर आहेत. पुणे, महाड, अंबरनाथ, पनवेल येथील कारवाईनंतर, गेल्या आठवड्यात कांदिवलीतून ८ बांगलादेशींसह ९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतूनही एटीएसला महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे समजते. त्या दिशेने तपास सुरू आहे. त्या पाठोपाठ कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात काही बांगलादेशी अजूनही ठाण मांडून असल्याची माहिती एटीएसच्या चारकोप पथकाला मिळाली. त्यानुसार, रविवारी त्यांनी या परिसरात सापळा रचला. ८ बांगलादेशींना अटक केली. अटक बांगलादेशी हे १९ ते ३३ वयोगटांतील आहेत. आठही जण बांगलादेशातील जस्सोर जिल्ह्यातील नारायणपूर, बेनापूर, दिही, गचखली या भागांतील रहिवासी आहेत. यापैकी दोघांकडे भारतीय पॅन कार्ड आणि आधार कार्ड आढळून आले आहेत. आठही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. या आठ जणांचा एबीटीसोबत काही संबंध आहे का? या दिशेने त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.