Join us  

Omicron Variant : चिंताजनक! राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद; ७ मुंबई अन् १ वसईतील रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 7:45 PM

आतापर्यंत ९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

मुंबई: राज्यासाठी एक चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नव्या ८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी ७ रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण वसई-विरारमधील आहे. त्यामुळे एकूण २८ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यामधील ९ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दक्षिण आफ्रिकेतून फैलावास सुरुवात होऊन युरोपमध्ये थैमान घालत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता भारत-चीनसह पाकिस्तानसह अनेक आशियाई देशांमध्ये शिरकाव केला आहे. कोरोनावर हल्लीच झालेल्या संशोधनामधून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यापासून लस कमकुवत ठरत असल्याचे समोर आले आहे. मात्र गंभीर आजारांविरोधात त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. 

दरम्यान, ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली आहे. त्यामुळे  ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या जगभरातील पहिल्या रुग्णाची नोंद आता झाली आहे. बोरिस जॉन्सन म्हणाले की, दररोज ओमायक्रॉनची लागण झालेल्या शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ३० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

रुग्णालयाती रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता -

डब्ल्यूएचओने एका निवेदनात म्हटले आहे, की जागतिक स्तरावर व्हेरिअंट ऑफ कंसर्नशी संबंधित रुग्णसंखेत वाढ झाल्याने, हॉस्पिटलायझेशन आणि मृतांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे. याच वेळी, या नव्या व्हेरिअंटने संक्रमित झालेल्या लोकांच्या स्थितीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणखी माहितीची आवश्यकता आहे. यामुळे देशांनी रुग्णालयात दाखल रुग्णांशी संबंधित माहिती शेअर करावी, असेही WHO ने म्हटले आहे. सध्या हा नवा व्हेरिअंट ६०हून अधिक देशांत पसरला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याओमायक्रॉनमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस