मुंबई: राज्यभरात गेल्या 24 तासांत राज्यात आज 902 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 64 लाख 95 हजार 929 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71% इतके झाले आहे.
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या सहा कोटी 74 लाख 41 हजार 806 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 47 हजार 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजे एकूण नमुण्यापैकी राज्यात 9.86 टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 79,556 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज आठ नव्या रुग्णाची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णापैकी सहा रुग्ण पुण्यातील आहेत. तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येकी एका-एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
डेल्टाची जागा घेणार ओमायक्रॉन-
आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना लव अग्रवाल म्हणाले की, ओमाक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. राज्यात आतापर्यंत 32 प्रकरणे आढळून आली आहेत. तर, दिल्लीत 22 लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार आगामी काळात डेल्टा व्हेरियंटची जागा घेऊ शकतो.
दररोज 10 हजार कोरोना केसेस-
आतापर्यंत देशातील एकूण ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. 11 राज्यांमध्ये 101 ओमायक्रॉन संक्रमित झाल्याची पुष्टी आहे. याशिवाय, मागील 20 दिवसांपासून दररोज 10,000 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. परंतु आता या नवीन ओमायक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.