अक्षय देशपांडे, हौशी जलतरणपटू
वीकेन्ड म्हणजे केवळ मित्रांसोबत पार्टी असे एक सूत्र अलीकडे दिसत असतानाच दुसरीकडे आता वीकेन्डचे निमित्त साधून आरोग्यदायी उपक्रम करण्याचा ट्रेण्ड देखील मुंबईत रुजताना दिसत आहे. यातूनच अलीकडे एका खासगी संस्थेने पोहण्याची आवड असलेल्या लोकांसाठी एक खास वीकेन्ड स्पर्धा आयोजित केली होती. ही स्पर्धा म्हणजे खरंतर एक आव्हानच होतं. या आव्हानाची माहिती इच्छुक लोकांनी आपापल्या मित्रांपर्यंत पोहोचवली आणि मग सर्वांनी यात सहभागी होण्यासाठी सज्जता सुरू केली. कारण स्पर्धेची वेळ होती रात्री ८ ते सकाळी आठ आणि स्विमिंग पूलमध्ये का होईना पण कमाल अंतर पोहायचे होते ३२ किलोमीटर. या स्पर्धेकरिता पात्र होण्यासाठी किमान २० किलोमीटर पोहता येणे आवश्यक होते. तर ३२ किलोमीटर हे स्पर्धेचे कमाल अंतर होते.
...अर्थात सहभागी झालेल्या सर्वांनाच सरसकट ३२ किलोमीटर पोहायचे नव्हते. तर यासाठी काही विशिष्ट श्रेणी निश्चित करण्यात आल्या होत्या. सर्वात मोठी श्रेणी होती ती १२ तास एकट्याने पोहण्याची. दुसरी १२ तासांचा रिले. म्हणजे, एखादा मित्र समूह मिळून अंतराचे नियोजन करून १२ तास सलग पोहणे असा. यासाठी चार जणांची टीम असणे आवश्यक होते. प्रत्येकाने सलग एक तास पोहायचे, मग पुढचा पोहणार, मग पुन्हा नंबर आला की पुन्हा पोहायचे. जशी २१ किलोमीटरची हाफ मॅरेथॉन असते तशाच पद्धतीची अर्ध्या अंतराची देखील एक स्पर्धा तिथे होती. यामध्ये एकट्याने सलग १० किलोमीटरसाठी सलग सहा तास पोहायचे किंवा ५ किलोमीटरसाठी तीन तास सलग पोहायचे. जी व्यक्ती यामध्ये १६ किलोमीटरचे अंतर पार करेल, त्याला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांपैकी एकाने तर सहा तासांत १६.६ किलोमीटर पोहून ते सुवर्णपदक पटकावले.
खरंतर एका वीकेन्डला ही स्पर्धा होणार होती. पण ती केवळ एका वीकेन्डपुरती नव्हती. तर आमच्यासाठी दीड महिना प्रत्येक दिवस या स्पर्धेच्या तयारीत गेला. केवळ स्विमिंग येते म्हणून आम्ही सहभागी झालो इतके हे गणित साधे नव्हते. त्याचा उत्तम सराव असणे गरजेचे होते. एकेका दिवशी तर आम्ही दिवसातून दोन-दोन वेळा पोहायचो. सुरुवातीला आमच्यामध्ये कुणाची किती क्षमता आहे, कोण कसा तग धरू शकतो किंवा रिले करताना कोणानंतर कोण, असा क्रम असे सारे ठरवत आमची स्ट्रॅटेजी निश्चित करण्यात वेळ गेला.
या संदर्भात आम्ही सुरू केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही सातत्याने एकमेकांना ऊर्जा देत होतो. मोटिव्हेट करत होतो. यासोबत योग्य त्या प्रमाणात झोप, यथोचित डाएट असे सारे काही आम्हाला सांभाळायचे होते. ते सारे केले आणि प्रत्यक्ष स्पर्धेची संध्याकाळ उगवली. आम्ही उत्साहात तिथे गेलो.
आमच्याप्रमाणेच स्पर्धेत भाग घेणारे अनेक जण तिथे होते. एकमेकांचा उत्साह वाढवत होते. रात्री ८ ते सकाळी ८ असे १२ तास आता आम्ही एकमेकांच्या साथीने एकमेकांना उत्साह वाढवत प्रत्येकाने निश्चित केलेले अंतर लिलया पार केले आणि आम्ही परतलो ते मनात समाधानाची पोचपावती घेऊनच. हे समाधान शब्दातीत आहे आणि अनेक नव्या ध्येयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करायचा म्हणजे, आम्ही एकमेकांशी स्पर्धा करत नव्हतो तर स्वतःसोबतच, स्वतःच्या क्षमतेसोबत आमची स्पर्धा होती. त्यामुळे सकाळी ८ वाजता जेव्हा स्पर्धा संपली तेव्हा आम्ही सर्वच जण विजेते होतो.