राज्यभरात परिवहन विभागातील ४५ टक्के पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:54 AM2019-07-30T03:54:58+5:302019-07-30T03:55:29+5:30
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला
नितीन जगताप
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आणि औद्योगिकीकरण होत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात जलद परिवहनासाठी दुचाकी वाहने, चार चाकी वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. परिणामी परिवहन कार्यालयाच्या कामाचा भारही वाढला आहे. परंतु, परिवहन विभागातील वर्ग १ ते ४ वर्गांमधील मंजूर पदांपेक्षा सुमारे ४५ टक्के जागा रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढला आहे.
राज्यात वर्षाला लाखो नवीन वाहनांची भर पडते. त्यामुळे परिवहन कार्यालयात वाहनांशी संबंधित विविध कामांसाठी येणाºया नागरिकांची ये-जा असते. त्या तुलनेत कार्यालयात मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी वर्ग १ ते ४ मधील एकूण ५१०० पदांना मंजुरी देण्यात आली आहे, परंतु त्यामधील २८१७ पदे भरण्यात आली आहेत, तर २२८३ पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाचे मुख्यालय मुंबईत असून राज्यामध्ये एकूण १५ प्रादेशिक परिवहन कार्यालये व ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, लेखा अधिकारी, मोटार वाहन अभियंता, जनसंपर्क अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, प्रणाली प्रशासक, वरिष्ठ व कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ
लेखा परीक्षक, लिपिक, शिपाई, पहारेकरी आदी पदे रिक्त आहेत.
लेखा परीक्षकांवर कामाचा ताण वाढल्याने प्रलंबित फायलींची संख्या वाढत आहे. परिणामी कार्यरत असलेल्या प्रत्येक लिपिकापासून
वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत कामाचा ताण वाढत आहे.
भरतीचा मार्ग मोकळा
परिवहन विभागातील काही पदे रिक्त आहेत. यामधील कनिष्ठ लिपिक पदे कंत्राटी पद्धतीने भरली आहेत. त्यांचे काम सुरू आहे, पण कंत्राटी पद्धतीने भरती केल्यामुळे संकेतस्थळावर ते दिसत नाही. तर सहायक मोटार वाहन निरीक्षकपदे रिक्त होती. त्यामुळे ८३२ जागांवर भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु नुकताच सर्वोच्च न्यायालयाने परिवहन विभागाच्या बाजूने निर्णय दिला आहे. या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून ती ८३२ पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. या भरतीनंतर जास्त पदे रिक्त राहणार नाहीत.
- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त
मोटार वाहन विभागातील रिक्त पदांची संख्या
वर्ग मंजूर भरलेली रिक्त पदांची
पदे पदे पदे टक्केवारी
वर्ग क्रमांक १ १०६१ ६३५ ४२६ ४०.१५
वर्ग क्रमांक २ ४६ २० २६ ५६.१२
वर्ग क्रमांक ३ ३५६६ १९५३ १६१३ ४५.२३
वर्ग क्रमांक ४ ४२७ २०९ २१८ ५१.०५
एकूण ५१०० २८१७ २२८३ ४४.७६