लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या टप्पा क्रमांक १ मध्ये उद्यानाच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घड्याळ मनोरा, तिकीटघर, प्रसाधनगृहे तसेच पर्यटक व लहान मुलांकरिता ८ ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉइंंट्स आकर्षकरीत्या तयार करण्यात आले आहेत.उद्यान व प्राणिसंग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटक व लहान मुलांकरिता कार्टून प्रतिकृती, पाण्याचा कृत्रिम धबधबा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहावरील लाकडी पूल, सुमारे १५ फूट उंच भू-छत्रींचा यात समावेश असून, पर्यटक व नागरिकांच्या आनंदात हा सेल्फी पॉइंट भर टाकणारा ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर व माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांनी उद्यानात विकसित करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट्स व हम्बोल्ट पेंग्विन दालनाची पाहणी केली. शिवाय राणीच्या बागेतील पहिल्या टप्प्याचे आधुनिकीकरण व लहान मुलांना मनोरंजनासाठी आकर्षक सेल्फी पॉइंट्स प्रतिमा तयार करून आकर्षकरीत्या मांडणी केल्याबद्दल त्यांनी पालिकेचे कौतुकही केले. आता चिमुकल्यांसाठी करण्यात आलेल्या या सगळ्या आकर्षणांना ते कसे प्रतिसाद देतात ते लवकरच कळेल.
राणीच्या बागेत ८ सेल्फी पॉइंटस
By admin | Published: May 11, 2017 1:46 AM