अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 10:07 PM2017-09-04T22:07:04+5:302017-09-04T22:24:32+5:30

अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे 8 विशेष गाड्या सोडणार आहे.

8 special local trains leaving Central Railway on Anant Chaturdashi | अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल

अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल

मुंबई, दि. 4 - अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे 8 विशेष गाड्या सोडणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. तसेच पश्चिम रेल्वेनंही अनेक जलद गाड्यांना चर्नी रोड ते चर्चगेटदरम्यानच्या स्टेशनांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 17.30 पासून ते रात्री 20.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान सुटणा-या सर्व जलद गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्नी रोडमधल्या सर्व स्टेशनांवर थांबवण्यात येणार आहेत.

‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील 53 रस्ते बंद करण्यात आले आहेत. 54 रस्त्यांवर एकेरी वाहतुकीला परवानगी असेल. 99 ठिकाणी वाहन उभे करण्यास मज्जाव करण्यात आला असून, 5 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) दिवशी बाप्पाच्या निरोपासाठी वाहतूक पोलीस जागता पाहारा देणार आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे 3 हजार 500 अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. त्याचबरोबर 500 ट्रॅफिक वॉर्डनदेखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. वाहतुकीच्या चोख नियोजनासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, वांद्रे बडी मशीद, जुहू चौपाटी आणि पवई येथे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे.

हे मार्ग राहणार बंद -
दक्षिण मुंबईतील काळबादेवी विभागातील जगन्नाथ शंकर शेठ रोड, व्ही.पी. रोड, सी.पी. टँक रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. भायखळा विभागातील भारतमाता ते बावला कंपाउंडपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी, चिंचपोकळी पूल ते यशवंत चौक, काळाचौकी असा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.



वरळी विभागातील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड वरळी नाका ते हाजीअली जाणारा दक्षिण वाहिनी मार्ग बंद राहणार आहे. परिणामी डॉ. ई. मोझेस रोडवरून महालक्ष्मी रेल्वे स्थानक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ना.म. जोशी मार्गदेखील विशिष्ट टप्प्यावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दादर विभागातील एस.के. बोले रोडवर हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चौकपर्यंत एकेरी वाहतुकीची मुभा असणार आहे.



विसर्जनादिवशी सकाळी 11 ते दुस-या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत शहरातील 99  ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मलबार हिल विभागातील विसर्जन मार्गावरील 11 ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दादर चौपाटी परिसरातील केळूसकर मार्ग (मुख्य, उत्तर आणि दक्षिण), चैत्यभूमी ते शिवाजी पार्क जंक्शन आणि चौपाटी परिसरात वाहने उभी करण्यास मनाई असणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. शहरातील 53 रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

Web Title: 8 special local trains leaving Central Railway on Anant Chaturdashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.