मुंबई, दि. 4 - अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे 8 विशेष गाड्या सोडणार आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे. तसेच पश्चिम रेल्वेनंही अनेक जलद गाड्यांना चर्नी रोड ते चर्चगेटदरम्यानच्या स्टेशनांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 17.30 पासून ते रात्री 20.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान सुटणा-या सर्व जलद गाड्या मुंबई सेंट्रल ते चर्नी रोडमधल्या सर्व स्टेशनांवर थांबवण्यात येणार आहेत.‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील 53 रस्ते बंद करण्यात आले आहेत. 54 रस्त्यांवर एकेरी वाहतुकीला परवानगी असेल. 99 ठिकाणी वाहन उभे करण्यास मज्जाव करण्यात आला असून, 5 सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) दिवशी बाप्पाच्या निरोपासाठी वाहतूक पोलीस जागता पाहारा देणार आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे 3 हजार 500 अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. त्याचबरोबर 500 ट्रॅफिक वॉर्डनदेखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. वाहतुकीच्या चोख नियोजनासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, वांद्रे बडी मशीद, जुहू चौपाटी आणि पवई येथे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं मध्य रेल्वे सोडणार 8 विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 10:07 PM