Join us

मार्चमध्ये म्हाडाची ८ हजार घरे, सर्वाधिक घरे गोरेगाव पहाडी परिसरात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 6:54 AM

अत्यल्प उत्पन्न गटातील घराची अंदाजित किंमत ३५ लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या प्रत्येकी ४ हजार अशी एकूण आठ हजार घरांसाठीची लॉटरी मार्च महिन्यात निघणार आहे. मुंबई मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांपैकी २ हजार ६०० घरे गोरेगाव पहाडी परिसरातील आहेत. विशेष म्हणजे येथे अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधली जात असून, यातील अत्यल्प उत्पन्न गटातील घराची अंदाजित किंमत ३५ लाख रुपये आहे. गृहनिर्माण बाजारपेठेत मात्र या घरांची किंमत अंदाजे ७० लाखांच्या आसपास असल्याचे समजते.

गेल्याच महिन्यात म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांची लॉटरी जाहीर झाली. आता म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे मार्च महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठीची जाहिरात येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे.

मार्च महिन्यातील लॉटरीत अत्यल्प आणि अल्प आर्थिक उत्पन्न गटातील सर्वाधिक घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही घरे सर्व सुविधांनी सज्ज असणार असून, मुंबईमधील उर्वरित ठिकाणांवरील घरांचा समावेशही मुंबई मंडळाच्या लॉटरीत केला जाणार आहे.

कोकण मंडळाची घरे कुठे?- कोकण मंडळाची घरे ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यांतील असतील. 

मुंबई मंडळाची घरे कुठे?- मुंबई मंडळाच्या लॉटरीत गोरेगाव पहाडी येथे सर्वाधिक घरे आहेत.

अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही आर्थिक उत्पन्न गटांसाठी येथे घरे बांधली जात आहेत. 

२०२५ साली पण लॉटरी!

  • गोरेगाव पहाडी येथे मध्यम उत्पन्न आणि उच्च उत्पन्न आर्थिक गटांसाठीही घरे बांधली जात आहेत.
  • उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरे बांधली जात आहेत. ९६० चौरस फुटांची ही घरे आहेत. 
  • मध्यम उत्पन्न गटासाठी २२७ घरे बांधली जात आहेत. ८०० चौरस फुटांची ही घरे आहेत.
  • २०२५ सालच्या लॉटरीमध्ये या घरांचा समावेश केला जाणार आहे.

 

घरांचा आकार, किंमत आणि उत्पन्न गट...

  • गोरेगाव पहाडी येथील १ हजार ९४७ घरांचा समावेश अत्यल्प उत्पन्न गटात करण्यात आला असून, ही घरे ३२२ चौरस फुटांची आहेत. घराची किंमत अंदाजे ३५ लाख रुपये आहे. 
  • गोरेगाव पहाडी येथील ७३६ घरांचा समावेश अल्प उत्पन्न गटात करण्यात आला असून, ही घरे ४८२ चौरस फुटांची आहेत. घराची किंमत अंदाजे ४५ लाख आहे.
  • गेल्या लॉटरीच्या तुलनेत यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती या प्रतिचौरस फुटामागे एक ते दीड हजार रुपयांनी वाढल्या आहेत.
टॅग्स :म्हाडागोरेगावसुंदर गृहनियोजन