राज्यात पोलिस कोठडीत ८० आरोपींचा मृत्यू ; देशभरातील संख्या ६९७
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:18 AM2024-09-26T07:18:32+5:302024-09-26T07:18:43+5:30
पाच वर्षांतील आकडेवारी : गुजरात देशात पहिला, महाराष्ट्र दुसरा
मुंबई : अक्षय शिंदेच्या चकमकीतील मृत्यूमुळे पोलिस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरात पोलिस कोठडीत ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ८१ मृत्यू गुजरातमध्ये तर त्याखालोखाल ८० मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.
कोठडीतील मृत्यूची ही आकडेवारी २०१८ ते २०२३ कालावधीतील आहे. वर्षभरात महाराष्ट्रात पाच आरोपींचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला.
मुंबई पोलिसांनी केलेले गुंडांचे एन्काउंटर
८३ - १९९९
७३ - २०००
९४ - २००१
४७- २००२
७ फेब्रुवारी २०१६ : हरियाणा पोलिसांनी संदीप गडोली या तेथील कुख्यात टोळीप्रमुखाला ठार मारले होते. त्यानंतर हरियाणा पोलिसांवर खोट्या चकमकीचा आरोप झाला.
२८ जुलै २०२३ : हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपक जाधव याने बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती.
८ सप्टेंबर २०२३ : मुंबईत हवाई सुंदरीची हत्या करणारा विक्रम अटवाल याने अंधेरीत पोलिस कोठडीत गळफास घेतला होता.
१ मे २०२४ : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपी अनुज थापन (२३) या आरोपीने १ मे रोजी गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केली.
ख्वाजा युनूस : घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये २ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित परभणीतील सॉफ्टवेअर इंजिनिअर ख्वाजा युनूस याला अटक झाली होती. पोलिसांच्या जीपला ६ जानेवारी २००३च्या रात्री अपघात झाल्यानंतर तो पळून जात होता, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, त्याला पोलिसांनीच ठार मारल्याचे आरोप झाले होते.
लखन भैया : छोटा राजनचा साथीदार राम नारायण गुप्ता ऊर्फ लखन भैयाला ११ नोव्हेंबर २००६ रोजी पोलिसांनी अटक केली. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचे वर्सोवा येथे एन्काउंटर झाले. ती चकमक बनावट होती, असा आरोप त्याच्या भावाने केला होता. या प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.