मराठी साहित्य संमेलन: दिल्लीत फडकणार मराठी साहित्याची पताका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:53 IST2025-02-06T12:51:36+5:302025-02-06T12:53:16+5:30
संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखकांची मोठी फळी विषयाचे वैविध्य घेऊन प्रकाशझोतात येणार असून, तीन दिवसात ८० पुस्तके प्रकाशित होणार आहेत.

मराठी साहित्य संमेलन: दिल्लीत फडकणार मराठी साहित्याची पताका!
-स्वप्नील कुलकर्णी
मुंबई : दिल्लीती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी आयोजकांचे, अनेक प्रकाशकांचे प्रयत्न सुरू आहेत. संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखकांची मोठी फळी विषयाचे वैविध्य घेऊन प्रकाशझोतात येणार असून, तीन दिवसात ८० पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी सांगितले की, साहित्य संमेलनात महाराष्ट्राच्या विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार पुस्तके आम्ही प्रकाशनासाठी निवडली आहेत.
धुळे येथील राजवाडे शैक्षणिक संस्थेची सहा पुस्तके, राधेश्याम स्वामी यांचे विश्व साहित्य पीठाद्वारे ‘अन्नाम सरोवर’ हे महाकाव्य, चपराकची २५ आणि लाडोबाची ५ पुस्तके, मुंबईतील काशीनाथ माटल यांचा कोरोनाच्या सकारात्मक गोष्टी मांडणारा ‘सावट’ हा कथासंग्रह आणि बाबुलाल राठोड यांचा ‘कोरोना’ काव्यसंग्रह, जयसिंगपूर येथील प्रा. वसंतराव काळे यांचे खगोल आणि अंतराळ विज्ञान हे पुस्तक, डॉ. न. म. जोशी यांचे लालकृष्ण अडवाणी यांच्यावरील चरित्र, कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांचे कोकणातील फुलांवरील ‘ऋतुरंग’ हे अनोखे पुस्तक, कवी अनंतराव घोगले यांचा मोडी आणि देवनागरी भाषेतील ‘सोनचाफा’ हा काव्यसंग्रह तसेच बालसाहित्याची पुस्तके प्रकाशित होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खान्देशावर सहा पुस्तके
धुळ्यातील वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची खान्देशावर सहा पुस्तके संमेलनात प्रकाशित होणार आहेत. त्यामध्ये प्राचीन खान्देश सात वाहनकाळापर्यंत, खान्देशातील मध्यकालीन स्थापत्य, यादवकालीन खान्देश, खान्देशातील किल्ले, मध्ययुगीन खान्देश स्वातंत्र्यलढ्यापर्यंत या पुस्तकांचा समावेश आहे, अशी माहिती प्रकाशकांनी दिली.
अंध वाचकांसाठी ब्रेलमधील पुस्तक
अंध वाचकांना संमेलनामध्ये कधीच ग्राह्य धरले जात नाही. लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांनी ब्रेलमध्ये लिहिलेले ‘महाराजा सयाजीराव गायकवाड’ हे पुस्तक संमेलनात प्रकाशित होणार आहे.
‘गझल’लाही मानाचे पान
सिराज करीम शिकलगार या कवीने गझलवरची ‘गझल शोभा’, ‘गझल सागर’, ‘गझल प्रस्तावना’, ‘गझल प्रतिभा’, ‘गझल अरुण’, ‘गझल रेखा’, ‘गझल साधना’ ही महत्त्वाची सात पुस्तके लिहिली आहेत.
जुने ते सोने
नाशिक येथील प्रा. दिलीप फडके यांनी शंभर वर्षांपूर्वीच्या पुस्तकाविषयीचे सदर ‘लोकमत’मध्ये लिहिले होते. ती १८३० ते १९१० या कालखंडातील गाजलेली पुस्तके होती. त्या स्तंभाचे ‘पुस्तकनामा’ हे पुस्तक संमेलनात प्रकाशित होत आहे.