लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महावितरणने आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. यामध्ये ५९ हजार ७९९ नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या पंधरवड्यात उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
आतापर्यंत ३४ जिल्ह्यांमध्ये वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. त्याचा लसीकरणासाठी मोठा फायदा झाला आहे. ७५ हजार ३२३ पैकी आतापर्यंत ५९ हजार ७९९ (७९.४ टक्के) नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्थानिक कार्यालयांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
एक महिन्यापूर्वी महावितरणमधील सुमारे ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या महिन्याभरात ७९.४ टक्क्यांवर गेली आहे. आतापर्यंत ४ हजार ५८ कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
* चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित
कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी परिमंडल व मुख्यालय स्तरावर दैनंदिन आढावा घेण्यात येत असून या ठिकाणी चार सदस्यीय कोरोना समन्वय कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांमध्ये उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.
- विजय सिंघल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण
* कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण (टक्क्यांमध्ये)
बारामती परिमंडळ ९१.२
पुणे व कोल्हापूर- ८७.८४
कल्याण- ८५.९
औरंगाबाद- ८४.१
कोकण- ८२.२
भांडुप- ८१.५
नांदेड- ८०.९
जळगाव- ८०.२
अमरावती- ७७.९
नागपूर- ७४
अकोला- ७३.२
नाशिक- ७३.५
चंद्रपूर- ७१.५
गोदिंया- ७०.४
लातूर परिमंडळ ६५.९
-------------------