...म्हणून तब्बल 80 टक्के विजेत्यांनी म्हाडाला घरं परत केली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 05:36 AM2018-07-22T05:36:50+5:302018-07-22T05:57:19+5:30
लोअर परळ विभागातील २०१७च्या लॉटरी विजेत्यांची भूमिका
मुंबई : लोअर परळ विभागातील २०१७मध्ये म्हाडाच्या लॉटरीत लागलेली घरे ८० टक्के विजेत्यांनी म्हाडाला साभार परत केली. म्हाडाची घरे खिशाला परवडणारी नाहीत, असा आक्षेप घेत ३६पैकी २९ लॉटरी विजेत्यांनी घरे परत केली आहेत.
म्हाडाने १० नोव्हेंबर २०१७ला मुंबईतील परळ विभागाच्या लॉटरीत १ कोटी ९६ लाख ६७ हजार १०३ रुपये किमतीच्या ४७५ स्क्वेअर फूट असलेल्या २ घरांचा आणि १ कोटी ४२ लाख ९६ हजार ५१७ रुपये किमतीच्या ३६३ स्क्वेअर फूट असलेल्या ३४ घरांचा समावेश केला होता. ३६ घरांसाठी विजेते जाहीर झाले. मात्र यातील ७ विजेते सोडून उर्वरित २९ विजेत्यांनी घरे परत केली.
म्हाडाची ही घरे परवडणारी नाहीत. आम्ही माहिती काढली असता लोअर परळमधील त्याच भागात खासगी विकासकांच्या घरांच्या किमती या म्हाडाच्या घरांच्या किमतीपेक्षा कमी आहेत. म्हाडाने लॉटरीत जाहीर केलेल्या घरांची जागाही कमी असल्याने आम्ही घर म्हाडाला परत करण्याचा निर्णय घेतला, असे या लॉटरीत लोअर परळच्या घरांसाठी विजयी झालेल्या शारदा तंदूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एका लॉटरीतील ८० टक्के घरे म्हाडाकडे परत आली असतील तर त्याचा परिणाम येणाऱ्या लॉटरीवरही होईल. त्यामुळे म्हाडाचे अधिकारी आगामी लॉटरीतील घरांची किंमत कमी करण्याची धडपड करीत असल्याची गोपनीय माहिती आहे.
...तर नवीन लॉटरीत घरांचा समावेश
म्हाडाच्या २०१७च्या लॉटरीतील २९ घरे म्हाडाला परत करण्यात आली आहेत. आता आम्ही त्या लॉटरीतील वेटिंग लिस्टवर असणाºयांना ही घरे खुली करून देणार आहोत. यापैकी कोणाला घर घ्यायचे असल्यास आम्ही त्यांना प्राधान्य देऊ. ही घरे वेटिंग लिस्टमधील अर्जदारांनी न घेतल्यास, येणाºया मुंबई विभागीय मंडळाच्या लॉटरीत या घरांचाही समावेश करण्यात येईल.
- दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडा.