चार भिंती आडूनही होताहेत पदवीधर... ८० टक्के कैद्यांनी घेतले शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 12:35 PM2023-04-08T12:35:17+5:302023-04-08T12:35:43+5:30
जेलच्या आतमध्ये कसं शिकवलं जातं ..... वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्रामध्ये एकूण ६४ कारागृह असून, त्यात ९ मध्यवर्ती कारागृह, एक महिला, तर २८ जिल्हा, १९ खुल्या कारागृहांचा समावेश आहे. कारागृहाची एकूण क्षमता २४ हजार ७३३ असताना ४१ हजार ९८० कैदी कारागृहात आहेत. त्यामध्ये ६० ते ६५ टक्के कैदी न्यायालयीन बंदी आहेत, तर ३५ ते ४० टक्के कैदी हे शिक्षा झालेले आहेत.
गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेले ८० कैदी पदवीधर झाले आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर, ७ कैद्यांनी पदव्युत्तर आणि २ जणांनी १० वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले असल्याची माहिती कारागृह विभागाकडून देण्यात आली आहे. कारागृहातील परीक्षा केंद्रातून बंद्यांनी १० वी, १२ वी /बी. ए./बी. कॉम/एम. ए. इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेतल्या आहेत.
असे मिळते शिक्षण...
शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य कारागृह विभागाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली आहे. त्यानुसार कारागृहात नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठामार्फत २०१४ पासून अभ्यासकेंद्र चालविले जाते. या अभ्यासकेंद्रामार्फत कैद्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो. शिक्षा झालेल्या कैद्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जाते. साक्षर असलेल्या कैद्यांची अभ्यासक्रमाला बसण्यासाठी वर्षांतून दोन वेळा पूर्वपरीक्षा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कैद्यांना त्यांच्या आवडीनुसार कला आणि वाणिज्य शाखेला प्रवेश दिला जातो.
म्हणून ९० दिवसांची विशेष माफी
- अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवाचे अमिताभ गुप्ता यांनी, शिक्षण पूर्ण केलेल्या ८९ कैद्यांना ०३ ऑक्टोबर २०१९ ते ३१ जानेवारीपर्यंत ९० दिवसांची विशेष माफी मंजूर केली.
- तसेच विभागीय कारागृह उपमानिरीक्षक यांच्या अधिकारातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या ६ बंद्यांना ६० दिवसांची विशेष माफी देण्यात आलेली आहे.