राज्यात ८० टक्के गर्भवतींना ॲनिमियाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:07 AM2021-04-23T04:07:11+5:302021-04-23T04:07:11+5:30
आरोग्य व कुटुंब अहवालातून लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात २०१९ - २० सालाच्या तुलनेत २०२० - २१ सालात ...
आरोग्य व कुटुंब अहवालातून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात २०१९ - २० सालाच्या तुलनेत २०२० - २१ सालात गर्भवतींमध्ये रक्तक्षयाचे (ॲनिमिया) प्रमाण किंचित कमी झाले आहे. मात्र, अजूनही ८० टक्के गर्भवतींना हा त्रास असल्याचे राज्याच्या आरोग्य व कुटुंब अहवालातून समोर आले. राज्यात २०१९ - २० साली ४ लाख ४० हजार ५७९ गर्भवतींमध्ये ॲनिमिययाचे निदान झाले होते, तर २०२० - २१ या वर्षात ही संख्या ४ लाख २ हजार ७९९ वर आली आहे.
सलग दोन वर्षे चार लाखांहून अधिक गर्भवतींच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी ११च्या खाली असल्याची नोंद आहे. राज्यात गर्भवतींमध्ये गंभीर स्वरुपाच्या आढळणाऱ्या ॲनिमियाचे प्रमाण २०१९ - २० साली ९२.५ टक्के होते, तर यात किंचित घट होऊन हे प्रमाण ८०.६ टक्क्यांवर आले आहे. २०१९ - २० साली २० हजार ८३९ गर्भवतींच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सातच्या खाली होती, तर २०२० - २१ साली हे प्रमाण १२ हजार ६१२ वर आले आहे.
* अॅनिमियाची कारणे
- अनेकदा अॅनिमिया आहारातील लोहाच्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्त्वाची कमतरता, अतिरक्तस्राव, लहान मुलांमध्ये जंतांचा प्रादुर्भाव, लाल पेशींचे काही आनुवांशिक आजार (सिकल सेल अॅनिमिया, थॅलासेमिया) तसेच काही दीर्घकालीन आजार ही इतर कारणे आहेत.
- गरोदरपणातील ‘ब’ जीवनसत्त्वाच्या अतिरिक्त गरजेमुळे तसेच प्रसुतीवेळी रक्तस्राव झाल्यानेही महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण जास्त आढळते. प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये पाळीत अतिरिक्त रक्तस्राव होत असल्यास त्यांना अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये कुपोषण आणि अयोग्य आहार ही अॅनिमियाची प्रमुख कारणे आहेत.
* असे हाेतात दुष्परिणाम
अॅनिमियामुळे हृदयावर व फुप्फुसांवर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो. थकव्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता अगदी कमी होते. प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो. गर्भवती महिलांना अॅनिमिया झाल्यास बाळाची वाढ अपूर्ण राहाते, अपुऱ्या दिवसांचे गर्भारपण, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपणात गुंतागुंत होणे असे धोके संभवतात.
* पेशींना कमी ऑक्सिजन मिळणे ही बाब गंभीर
अॅनिमियावर उपचार करताना लोह आणि आवश्यक तेव्हा जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जातात. तीव्र अॅनिमिया असल्यास लोहाचे इंजेक्शन आणि गरज पडल्यास रक्तही द्यावे लागते. अॅनिमिया होऊ नये म्हणून पौष्टिक आहार घेणे, तसेच वैयक्तिक आणि परिसराची स्वछता राखणे महत्त्वाचे आहे. अॅनिमिया हा आजार दुर्धर वाटत नसला तरी आपल्या शरीरातील प्रत्येक काम करणाऱ्या पेशीला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळत आहे, ही बाब अतिशय गंभीर आहे.
- डॉ. शीतल सोनटक्के, स्त्रीरोगतज्ज्ञ
* औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरीत सर्वाधिक प्रमाण
राज्यात गर्भवतींच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सातपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांत औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात २०२० - २१ या वर्षात औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांत याचे प्रमाण अनुक्रमे १०४.५ टक्के, १०० टक्के, १०० टक्के, १०० टक्के इतके आहे, तर राज्यात २०१९ - २० साली हे प्रमाण ९२.५ टक्क्यांवर होते. २०२० - २१ साली ते ८०.६ टक्क्यांवर आले आहे.
..................................