८० हजार शाळा बंद ही तर अफवा! शिक्षणमंत्र्यांचा खुलासा, शिक्षक संघटनांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:00 AM2018-01-09T02:00:00+5:302018-01-09T02:00:10+5:30
राज्यातील ८० हजार शाळा बंद होणार असल्याचे वक्तव्य शिक्षण सचिवांनी केल्याच्या वृत्तानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र हे वृत्त म्हणजे एक अफवा असल्याचा खुलासा केला आहे. मात्र या वृत्तावरून शिक्षण संघटनांमधील राजकारण तापले आहे.
मुंबई : राज्यातील ८० हजार शाळा बंद होणार असल्याचे वक्तव्य शिक्षण सचिवांनी केल्याच्या वृत्तानंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मात्र हे वृत्त म्हणजे एक अफवा असल्याचा खुलासा केला आहे. मात्र या वृत्तावरून शिक्षण संघटनांमधील राजकारण तापले आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या खुलाशानंतरही शिक्षक भारतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले आहे. एकही शाळा बंद करू देणार नाही, अशा घोषणा देणाºया शिक्षक भारती व छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. याउलट या वृत्ताबाबत शिक्षक परिषदेने थेट शिक्षणमंत्र्यांनाच जाब विचारला आहे. त्यावर शिक्षणमंंत्र्यांनी सरकार असा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे शिक्षक परिषदेस लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, सचिवांच्या वक्तव्यानंतर सर्वप्रथम शिक्षक परिषदेने निषेध व्यक्त करत यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांना विचारणा केली. शिवाय असा निर्णय झाल्यास रस्त्यावर उतरून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी असा कोणताही निर्णय शासन घेणार नसल्याचे सोमवारी लेखी पत्राद्वारे कळवल्याचा दावाही बोरनारे यांनी केला आहे.
बोलण्यापेक्षा लिहीत जा
शिक्षण सचिव नंदकुमार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिक्षण क्षेत्रातील वातावरण तापले आहे. यासंदर्भात मुख्याध्यापक संघटनेने शिक्षण सचिवांची भेट घेऊन त्यांना पेन भेट दिले आहे. सचिव बोलताना काहीही बोलून जातात, ते बोलू नका, त्यापेक्षा लिहीत जा, असा संदेश मुख्याध्यापक संघटनेने त्यांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठीसह अन्य भाषिक शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामध्येच सचिवांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांनी सचिवांना गप्प राहा, असे प्रतीकात्मक भेट देऊन सांगण्यात आल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.