मुंबई : अनेक दिवस उलटूनही बरे न होणाऱ्या गालाच्या आतील बाजूस आलेल्या अल्सरमुळे ८० वर्षीय आजोबांना दोन प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले. मात्र, वयाच्या उत्तरायणातही या गंभीर आजाराशी झुंज देत जगण्या-मरण्याच्या संघर्षात दोन्ही प्रकारच्या कर्करोगावर मात करण्यात आजोबांना यश आले आहे.
गेल्या १० वर्षांपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या या पवईस्थित ८० वर्षीय शांताराम मिरगळ यांना अल्सरचा त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीअंती हा अल्सर कर्करोगाचा असल्याचे निदान झाले. त्यानंतर, अन्य वैद्यकीय तपासण्या करताना तोंडात उजव्या बाजूला टॉन्सिल्सना गाठ असल्याचे निदर्शनास आले. याची बायोप्सी केली असता टॉन्सिल्सर कर्करोगाचे निदान झाले.
याविषयी, या रुग्णाला एकाच वेळी कॅव्हिटी कर्करोग आणि टॉन्सिल्स कर्करोगाचे निदान झाले. कर्करोगाच्या या स्थितीला सिंक्रोनस कर्करोग असेही संबोधतात. या कर्करोगाच्या स्थितीत शस्त्रक्रिया आणि रेडिएशननंतर जगण्याचा दर ४०-५० टक्के असतो. या रुग्णाच्या उपचार पद्धतीत शस्त्रक्रियेद्वारे अल्सर काढण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच टॉन्सिल्सच्या ट्यूमरकरिता रेडिएशन थेरपीचा निर्णय अंतिम ठरला, असे फोर्टिस रुग्णालयाच्या डोके व मानेच्या ओन्कोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. हितेश सिंघवी यांनी सांगितले. या रुग्णावर १२ नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली, रुग्णाला १६ नोव्हेंबर रोजी घरी पाठविण्यात आले असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून रेडिएशन थेरपीचे उपचार सुरू आहेत.
तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे हा कर्करोग होतो. तोंडात वारंवार फोड येऊ लागतात आणि त्यामुळे तोंड उघडणे कठीण होऊन जाते. यासोबतच तोंडाच्या आतील भागात लाल आणि पांढऱ्या रंगाचे डाग येतात. घसा किंवा गालांच्या आतील भागात फोड येतो आणि मुखाचा कर्करोग शरीरात स्थिरावतो. सामान्यपणे शस्त्रक्रिया करून कॅन्सर काढून टाकण्यालाच प्राधान्य दिले जाते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गालांमधील कर्करोग समूळ नष्ट केला जातो. या जखमा वाळल्यानंतर कर्करोगाचे विषाणू पुन्हा शरीरात पसरू नयेत, यासाठी उपचार घ्यावे लागतात. आजाराची व्याप्ती, खोली यावर उपचारांचे भवितव्य अवलंबून असते.- डॉ. हितेश सिंघवीकन्सल्टंट, हेड अँड नेक आँको सर्जरी