मुंबई - मकरसंक्रांतीनिमित्ताने रविवारसह सोमवारी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारादार मांजामुळे ८०० पक्षी जखमी झाले आहेत. चर्चगेटपासून विरारपर्यंत घडलेल्या घटनांतील जखमी पक्ष्यांचा हा आकडा असून, दहिसर, कांदिवली, मालाड, बोरीवली पटटयात अधिक पक्षी जखमी झाल्याचे अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे मानद पशु कल्याण अधिकारी मितेश जैन यांनी सांगितले.धारदार मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी रविवारी व सोमवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत विविध अशा २६ स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरातून सुमारे ८०० अधिक पक्ष्यांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, पतंगाचा मांजा अनेकवेळा झाडांसह तारांमध्ये अडकतो. हा मांजा पक्ष्यांसह मनुष्यालाही हानीकारक असतो. त्यामुळे अपघात होतात. चायनीज माजांवर बंदी असूनही त्याचा वापर केला जात असल्याने मितेश जैन यांनी खंत व्यक्त केली आहे.
मकर संक्रांतीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरात उडविण्यात आलेल्या पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेली ५ कबुतरे, ३ घार, १ कावळा या पक्ष्यांवर रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअरच्या डॉ. रिना देव यांनी पक्ष्यांवर रविवारी उपचार केले. मांजामुळे पक्षी जखमी होत असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बंदी असतानाही मांजाची विक्री व खरेदी सुरू असल्याचे म्हणणे पक्षी प्रेमींचे आहे.