तिवरांच्या प्रदेशातून ८ हजार टन कचरा जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:21 AM2018-04-30T04:21:48+5:302018-04-30T04:21:48+5:30
तिवरांचा प्रदेश प्रदूषणमुक्त करण्याच्या अभियानांतर्गत मुंबईतील आठ तिवरांच्या प्रदेशातून चार महिन्यांत तब्बल ८ हजार टन कचरा हटविण्यात आला आहे.
मुंबई : तिवरांचा प्रदेश प्रदूषणमुक्त करण्याच्या अभियानांतर्गत मुंबईतील आठ तिवरांच्या प्रदेशातून चार महिन्यांत तब्बल ८ हजार टन कचरा हटविण्यात आला आहे. दहिसर, गोराई, शिवडी, ऐरोली-वाशी, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा या तिवरांच्या प्रदेशात वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि मॅनग्रोव्ह फाउंडेशनने ‘सेव्ह मॅनग्रोव्ह, सेव्ह मुंबई’ या अभियांनातर्गत स्वच्छता मोहीम सुरू आहे. जमा करण्यात आलेल्या ८ हजार टन कचऱ्यात सर्वाधिक प्रमाण हे प्लॅस्टिक कचºयाचे होते.
मुंबईतील या आठ तिवरांच्या प्रदेशात १ जानेवारी २०१८ पासून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी राज्य वनविभागाचा कांदळवन कक्षाचे अधिकारी आणि कामगारवर्ग, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्थानिक नागरिकांचा या अभियानात सहभाग होता. आठ भागांमध्ये दररोज हा उपक्रम राबविला जात होता. दररोज १० ते १५ टन व आठवड्याला ७० ते ८० टन कचरा उचलला जात होता. २६ एप्रिलपर्यंत या ठिकाणांवरून एकूण ८ हजार टन कचरा उचलण्यात आला. तसेच चिनी मातीच्या मूर्ती, भांडी, डेब्रिज कचरा, सागरी कचरा, प्लॅस्टिक आणि काचेच्या बाटल्या, थर्माकोल, कप, काचेचे तुकडे, कागद, पुठ्ठा, मासेमारी जाळे, खेळणी, टायर्स यांचा समावेश आहे.
मला तिवरांच्या प्रदेशात स्वच्छता झाल्यामुळे आनंद होत आहे. तिवरांच्या भागात विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक जंगलांची स्वच्छता करण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी स्वखुशीने पुढे येत आहेत. नागरिकांमध्ये होणाºया बदलाचा तिवरांचे प्रदेश साक्षीदार आहेत.
- एन. वासुदेवन, अतिरिक्त वनअधिकारी, राज्य कांदळवन विभाग
तिवरांच्या प्रदेशाबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. चांगल्या कामासाठी पुढे आलेल्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. चार महिने राबविण्यात आलेला उपक्रम खूप फलदायी झाला.
- एम.एम. पंडितराव, विभागीय वनअधिकारी, मुंबई कांदळवन संवर्धन क्षेत्र