Join us  

गणपती आगमन सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट, ८१ स्मार्टफोन चोरीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 1:22 PM

गर्दीचा गैरफायदा घेत चोरांनी गेल्या तीन दिवसात ८१ जणांचे स्मार्टफोन चोरले आहेत.

मुंबई-

मुंबईत लालबाग-परळ भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात होत आहे. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांची मोठी गर्दी या परिसरात दर शनिवार, रविवारी पाहायला मिळत आहे. पण याच गर्दीत मोबाइल चोरांचा सुळसुळाट झाला. गर्दीचा गैरफायदा घेत चोरांनी गेल्या तीन दिवसात ८१ जणांचे स्मार्टफोन चोरले आहेत. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना अटक देखील केली आहे. तसंच यात काही सोनसाखळी चोरांचाही समावेश आहे. 

मोबाइल चोरीच्या बहुतांश तक्रारी या चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमन सोहळ्यातील आहेत. या गणपतीच्या आगमन सोहळ्यावेळी मोठी गर्दी लालबाग परिसरात झाली होती. जवळपास १ लाख लोक यावेळी उपस्थित होते असा अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी याच मंडळाच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्यावेळी ३५० स्मार्टफोन चोरीला गेले होते. 

"यंदाच्या वर्षी आम्ही आधीच काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे मोबाइल चोरीच्या घटना काही प्रमाणात कमी झाल्या. यात मोबाइल चोरांच्या काही टोळ्या गर्दीच्या वेळी सक्रीय होतात. गर्दीचा गैरफायदा घेत मोबाइल आणि पाकिट चोरीचे प्रमाण वाढते. चिंचपोकळी ब्रिज, लालबाग परिसरात आम्ही यावेळी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात केला होता. जो या संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवून होता. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेता आलं", असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. 

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये नूर मोहम्मद अब्दुल इनामदार (२८) राहणार सांताक्रूज गोळीबार, कुंदन दत्तानी (३६) राहणार नागपाडा, सुमीत सकपाळ (३३) डोंबिवली, धर्मवीर कांबळे (२१) चेंबूर आणि सर्वाना अर्जून (२६) ट्रॉम्बे यांचा समावेश आहे. सर्व आरोपींचे इतर व्यवसाय आहेत परंतु गणेश मिरवणुका पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन ते मोबाईल चोरतात अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

टॅग्स :मुंबईस्मार्टफोन