Join us  

शहरात ८१ बांधकामे धोकादायक

By admin | Published: May 23, 2014 3:00 AM

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील ८१ धोकादायक बांधकामांची यादी प्रसिद्ध केली आहे.

नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील ८१ धोकादायक बांधकामांची यादी प्रसिद्ध केली आहे. कांदा - बटाटा मार्केटसह, अग्निशमन दलाच्या इमारतीचाही यामध्ये समावेश असून यावर्षीही हजारो नागरिकांवर अपघाताचे सावट कायम राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक इमारतींची संख्या वाढत चालली आहे. पावसाळ्यामध्ये या इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिकेने यावर्षीही नेहमीप्रमाणे तब्बल ८१ बांधकामांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जवळपास १५ वर्षांपासून धोकादायक बनलेल्या कांदा - बटाटा मार्केटचाही समावेश आहे. मार्केटमध्ये जवळपास दहा हजार नागरिकांची रोज ये - जा होत असते. येथील अनेक गाळ्यांना टेकू लावण्यात आला आहे. छताला तडे गेले आहेत. धक्क्यांची स्थिती बिकट झाली आहे. यापूर्वी अनेक वेळा प्लास्टर पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षीही अपघाताच्या सावटाखाली सर्वांना जगावे लागणार आहे. येथील मॅफ्को मार्केटची स्थितीही बिकट झाली आहे. मार्केट बंद करण्यात आले असून लिलावगृहात मंडई भरविली जात आहे. धोकादायक इमारतींचे सर्वाधिक प्रमाण वाशी व नेरूळ परिसरात आहे. वाशी सेक्टर ९ व १० मधील जेएन टाईपच्या तब्बल ९ सोसायट्यांमधील सर्व बांधकामे धोकादायक आहेत. सेक्टर १ मधील बी टाईपची ८ बांधकामे धोकादायक आहेत. नेरूळमध्येही श्वेता, शिवनेरी, सहयोग अपार्टमेंट व इतर अनेक इमारतींची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. महापालिका प्रशासनाने सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. सदर इमारती राहण्यास अयोग्य आहेत. पावसाळ्यापूर्वी इमारती खाली करण्यात याव्यात. भविष्यात सदर ठिकाणी एखादा अपघात झाल्यास त्यास महापालिका प्रशासन जबाबदार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)