मुंबई: कार पार्किंगची लिफ्ट तुटून अंगावर पडल्याने ८१ वर्षीय व्यक्तीसह दोघे जखमी झाले. हा प्रकार सांताक्रुज पोलिसांच्या हद्दीत घडल्यानंतर सुनील एंटरप्राइजेस या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार वामन कारभारी (८१) हे पार्ले बिस्कीट कंपनीमधून सेवानिवृत्त झाले आहे. ते राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये आधी चाळ होती या बिल्डिंगचे मेंटेनन्स १० वर्षे रुस्तमजी बिल्डर्स करणार आहेत त्यानुसार बिल्डरने बिल्डिंगच्या तळमजल्यावर एक महिन्यापूर्वी कार पार्किंग करण्यासाठी लिफ्ट बसवली आहे ज्याला रहिवाशांनी विरोध केला होता. चार चाकी लिफ्ट बसवण्याचे काम रुस्तमजी बिल्डर्सने सुनील एंटरप्राइजेस याला दिले होते. त्यानुसार त्यात ३४ पार्किंग बसवण्यात आलेले आहेत. कारभारी यांच्या तक्रारीनुसार २४ मार्च रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास बिल्डिंगची साफसफाई करण्यासाठी नेमलेले चंद्रकांत गावडे (५६) आणि ते स्वतः अन्य दोन व्यक्तींसोबत लिफ्टच्या खाली बसले होते.
काही वेळाने दोघे उठून गेले मात्र गावडे आणि तक्रारदार हे तिथेच होते. याच दरम्यान एक लोखंडी कार लिफ्ट तुटून या दोघांवर पडली. यात कारभारी यांच्या डोक्याला आणि कमरेपासून पाठीला मार लागला. कारभारीचा मुलगा दीपक (५०) आणि स्थानिकांनी मिळून दोघांना बाहेर काढत होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. यामध्ये कारभारी यांच्या शरीरात रक्ताचे प्लॉट तयार झाले असून गावडे यांच्याही डोक्याला पाठीमागे जखम झाली तसेच पायाचे हाड म्हणून फ्रॅक्चर झाले. हा सगळा प्रकार सुनील एंटरप्राइजेस चे मालक यांनी बनवलेली चार चाकी लिफ्ट पार्किंग तुटून घडला असल्याने त्यांच्या विरोधात कारभारी यांनी तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३३८ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.