राज्यात उष्माघाताचे ८२ रुग्ण, सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यात रुग्ण
By संतोष आंधळे | Published: April 16, 2024 09:29 PM2024-04-16T21:29:32+5:302024-04-16T21:29:40+5:30
ठाण्यात चार तर रायगडमध्ये दोन रुग्णांची नोंद
मुंबई: राज्यात गेल्या दीड महिन्यात उष्माघाताच्या ८२ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी ४ रुग्ण हे ठाणे तर दोन रुग्ण रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. बुधवारपर्यंत ही लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघात टाळण्यासाठी लोकांनी सजग राहावे, असे सांगताना मुंबई महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. महापालिकेची प्रमुख रुग्णालये, सर्वसाधारण रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत उष्माघात बाधितांवरील उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १४ रुग्णालयांत शीत कक्ष (कोल्ड रुम) रुग्णशय्या आणि औषधे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्यात रुग्ण
आरोग्य विभागाने १ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत उष्माघाताच्या नोंद केलेल्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १२ रुग्णांची नोंद बुलढाणा जिल्ह्यातील आहे. मुंबईत मात्र अद्यापर्यंत एकाही रुग्णांची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. या काळात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.