मुंबईत शुक्रवारी ८,२१७ रुग्ण, ४९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:06 AM2021-04-17T04:06:36+5:302021-04-17T04:06:36+5:30
मुंबई : शुक्रवारी मुंबईत ८,२१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात तब्बल १० हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...
मुंबई : शुक्रवारी मुंबईत ८,२१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात तब्बल १० हजार ९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, मृत्यूच्या आकड्यात वाढ झाली असून, ४९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सक्रिय रुग्णांचा आकडा ८५ हजार ४९४ इतका आहे. रुग्णांची वाढ गेले काही दिवस तुलनेने कमी असल्याने, रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४२ दिवसांवर आला आहे, तर रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.६४ टक्का आहे.
आतापर्यंत मुंबईत पाच लाख ५३ हजार १५९ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी चार लाख ५४ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच १२ हजार १८९ रुग्णांचा वर्षभरात कोविडमुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मृत्युमुखी पडलेल्या ४९ रुग्णांपैकी २६ रुग्णांना सहव्याधी होत्या. मृतांमध्ये २९ पुरुष, तर २० महिला रुग्णांचा समावेश होता. ३१ मृत ६० वर्षांवरील होते, तर १४ रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. ४० वर्षांखालील चार रुग्णांचाही मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४५ हजार ४८६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर आतापर्यंत ४८ लाख एक हजार २१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.