मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ८२३ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 20:31 IST2021-02-19T20:31:31+5:302021-02-19T20:31:39+5:30
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे ८२३ नवीन रुग्ण
मुंबई - गेल्या आठवड्याभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ५२५ दिवसांवरुन शुक्रवारी ३९३ दिवसांवर आला आहे. दिवसभरात गेल्या महिन्याभराच्या तुलनेत सर्वाधिक ८२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ६५७७ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याने महापालिकेने १ फेब्रुवारीपासून मुंबईतील रेल्वे सेवा ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढल्याने गेल्या दोन आठवड्यांत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. १२ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५२५ दिवसांचा होता. मात्र एकाच आठवड्यात यात १३२ दिवसांची घट झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूच्या आकडा कमी राखण्यात पालिकेला यश आले आहे. शुक्रवारी ४४० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश होता. यापैकी चार रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर पाचही रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. आतापर्यंत ११ हजार ४३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३० लाख ९८ हजार ८९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
रुग्ण संख्येतील वाढ(फेब्रुवारी)
तारीख....रुग्ण संख्या.. दुपटीचा कालावधी
१२...५९९.....५२५
१३....५२९.....४९६
१४....६४५.....४७९
१५....४९३.....४५५
१६....४६१.....४४५
१७...७२१....४३६
१८....७३६....४१७
१९...८२३....३९३
.........१९ फेब्रुवारी....आतापर्यंत