मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसाची रात्री ८.३0 पर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत ८३.८ मिलीमीटर एवढी नोंद झाली आणि मुंबईची तुंबई झाली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून मुंबई शहर, उपनगरात पावसाच्या कोसळधारा अधून-मधून सुरू होत्या आणि सकाळी जोर पकडलेल्या पावसाने दुपारी दोनपर्यंत आपला मारा कायम ठेवला.मुंबईचे उपनगर, ठाणे, नवी मुंबईत सर्वत्र मुसळधार पावसाचा मारा होईल, असा अंदाजही हवामान खात्याने सकाळी ८ वाजता वर्तविला होता. तोदेखील खरा ठरला व या परिसरालाही पावसाने झोडपले. याच काळात ठाणे, कल्याण परिसराला पुढील दोन ते चार तासांसाठी तीव्रस्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार, पाऊस बरसला. याच वेळी हवामान खात्याने वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता वर्तविली. त्यानुसार, पुढील काही काळात वेगाने वाहत असलेल्या वाऱ्याने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले. दुपारी पावसाचा जोर किंचित कमी होतो, तोच पुन्हा चार ते सहा तासांसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरला तीव्र स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला. याच काळात मुंबईत ठिकठिकाणी ७० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास मात्र पावसाने किंचित विश्रांती घेतली. मात्र, हवामानात उल्लेखनीय बदल होत होते. उत्तर कोकणात मुंबई, ठाण्यावर आलेले पावसाचे ढग हटण्याचे नाव घेत नव्हते. त्यातच दुपारी पावणेदोनच्या सुमारास आलेल्या भरतीमुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा समुद्रात जाण्याचा मार्ग अडला. परिणामी, साचलेल्या पाण्याचा पातळी कायम राहिल्याने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली.विमानांना विलंबमुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई सेवेला बसला. कमी दृश्यमानता आणि खराब हवामानामुळे काही विमानांची उड्डाणे व आगमनाला विलंब झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शनिवारी सकाळी उड्डाण होणारी एकूण १२ विमाने रद्द करण्यात आली.सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि दुपारी पावणेदोन वाजता समुद्राला आलेली भरती; यामुळे मुंबईची तुंबई झाली होती.शनिवारी दिवसभर कोसळत असलेल्या पावसामुळे सायन, वडाळा, नेहरूनगर, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, साकीनाका, बैंगनवाडी, विद्याविहार, घाटकोपर आरसीटी मॉल, अंधेरी सब-वे, मिलन सब-वे, मेघवाडी, वांद्रे येथील नॅशनल कॉलेज, अंधेरीतील आकृती मॉल, बोरीवली येथील रिलायन्स एनर्जी जंक्शन येथे पावसाचे पाणी साचले.उदंचन संच आणि मनुष्यबळाच्या मदतीने जाळ्यांवरील कचरा बाजूला करून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. शनिवारी सायंकाळपर्यंत ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा झाला होता. परिणामी, मुंबई पूर्वपदावर आली होती. मुंबईवर कोसळधारांचा मारा होत असतानाच २२ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ८७ ठिकाणी झाडे पडली. ५ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.१३३.९ मिमी पावसाची नोंद २ आॅगस्टच्या सकाळी ८.३० वाजल्यापासून ३ आॅगस्टच्या सकाळी ८.३० पर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत १३३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.बांधकामाचा भाग कोसळून दोन जखमीमाहिम येथील जनता सेवक सोसायटी चाळीमधील एक मजली बांधकामाचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत मुर्तुजा अली आणि कौसुम अली हे दोघे जखमी झाले. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दोन्ही जखमींना दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
८३ मि.मी. पावसाने मुंबई तुंबली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 3:03 AM