घाटकोपरला पाचव्या मजल्यावर 84 कोटी रुपयांचा जलतरण तलाव; शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 09:45 AM2023-12-15T09:45:16+5:302023-12-15T09:46:16+5:30

घाटकोपर येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम अखेर मार्गी लागणार आहे.

84 crore swimming pool on fifth floor at Ghatkopar | घाटकोपरला पाचव्या मजल्यावर 84 कोटी रुपयांचा जलतरण तलाव; शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारणार

घाटकोपरला पाचव्या मजल्यावर 84 कोटी रुपयांचा जलतरण तलाव; शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारणार

मुंबई :  गेली अनेक वर्षे रखडलेले घाटकोपर येथील जलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम अखेर मार्गी लागणार आहे. या तलावाच्या  पुनर्बांधणीनंतर तो ऑलिम्पिक दर्जाचा होईल. त्याशिवाय तलाव परिसरात  शूटिंग रेंजसह अत्याधुनिक संकुलही उभारले जाणार आहे. त्यासाठी पालिका ८४ कोटी ३१ लाख रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे पाच मजली संकुलाच्या शेवटच्या मजल्यावर जलतरण  तलाव असेल. 

घाटकोपर पूर्वेकडील ऑडियन मॉल  या ठिकाणी १९७१ साली हा   जलतरण तलाव बांधण्यात आला.  घाटकोपरसह  विक्रोळी, विद्याविहार येथील नागरिकही या तलावाचा लाभ घेत होते.

 तलाव खूप जुना झाल्याने गळतीचे प्रकार घडू लागले.  गळती बंद करण्यासाठी पालिकेने एक कोटी रुपये खर्चही केले. मात्र, गळती काही थांबली नाही. 

 कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी २०१९ साली तलाव बंद करण्यात आला. तेव्हापासून स्थानिक आणि परिसरातील नागरिक जलतरण तलावाच्या सुविधेपासून वंचित होते. आता पुनर्बांधणी होणार असल्याने आगामी काळात तलाव पुन्हा खुला होईल. 

असणार दहा मार्गिका :

पुनर्बांधणीत पाच मजली इमारत बांधली जाणार असून, पाचव्या  मजल्यावर तलाव असेल. आधीचा  जलतरण तलाव २५ मीटर लांबीचा होता. नवा तलाव ५० मीटर लांबीचा अर्थात ऑलिम्पिक दर्जाचा असेल. १० जलतरणपटू १० मार्गिकांमधून पोहोण्याचा सराव करू शकतील. या तलावाच्या पुनर्बांधणीसाठी गुरुवारी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. तीन वर्षांत बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. 

या खेळांना प्राधान्य :

पुनर्बांधणी अंतर्गत  तलाव परिसरात क्रीडा संकुल उभारले जाईल. नेमबाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी शूटिंग रेंज असेल. बॉक्सिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, स्क्वॉश आदी खेळ खेळायला मिळतील.

Web Title: 84 crore swimming pool on fifth floor at Ghatkopar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.