‘मंडणगड’साठी चुरशीने ८४ टक्के मतदान

By admin | Published: November 1, 2015 10:58 PM2015-11-01T22:58:44+5:302015-11-01T22:58:44+5:30

आज फैसला : रत्नागिरी नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी ४९ टक्के मतदान

84 percent polling for 'Mandangad' | ‘मंडणगड’साठी चुरशीने ८४ टक्के मतदान

‘मंडणगड’साठी चुरशीने ८४ टक्के मतदान

Next

रत्नागिरी / मंडणगड : रत्नागिरी नगरपरिषदेच्या चार जागांसाठी आणि मंडणगड नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. मंडणगड नगरपंचायतीसाठी उत्साहात मतदान झाले. येथे सरासरी ८४.५५ टक्के मतदान झाले, तर रत्नागिरी नगरपरिषदेसाठी मात्र सरासरी ४९.५ टक्के मतदान झाले.
रत्नागिरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेचे उमेदवार संजय साळवी यांना उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान केले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे या रिक्त चार जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
गेले दोन महिने पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप आणि रंगात आलेल्या प्रचारामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये ४६ टक्के, तर प्रभाग क्रमांक ४मध्ये ५३ टक्के मतदान झाले. कोकणनगर, राजिवडा येथील दुपारच्या सत्रात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी त्यामानाने मतदानाचा वेग मंदावल्याने आकडेवारी ४९.५० टक्क्यांपर्यंतच पोहोचली.
मंडणगड नगरपंचायतीच्या सतरा प्रभागांत शांततेत मतदान पार पडले. शहरातील २३३९ मतदारांपैकी १९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शहरात सरासरी ८४.५५ टक्के मतदान झाले. (प्रतिनिधी)
 

आज मतमोजणी
रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज, सोमवारी सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या सभागृहात हाती घेण्यात येणार आहे, तर मंडणगड नगरपंचायतीची मतमोजणी सोमवारी तहसील कार्यालयात होईल. रत्नागिरी पालिकेतील सर्व निकाल पहिल्या तासाभरातच हाती येतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: 84 percent polling for 'Mandangad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.