दिलासा; सलग तिसऱ्या दिवशी काेराेनाची दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांच्या टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजारांच्या टप्प्यात असल्याची नोंद झाली, दुसरीकडे दिवसभरातील मृत्यूंचा आकडा काहीसा वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख १ हजार ५९० झाली असून, मृतांचा आकडा १२ हजार ५०१ झाला आहे. सध्या मुंबईत ८४ हजार ७४३ रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शहर, उपनगरात बुधवारी ६ हजार ७९० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५ लाख ३ हजार ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ४७ हजार २७० चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ५० लाख ७५ हजार १५२ कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ८४ टक्के झाले असून, १४ ते २० एप्रिलपर्यंत एकूण कोविड वाढीचे प्रमाण १.४२ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४८ दिवसांवर आला आहे. शहर, उपनगरातील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ११४ सक्रिय कन्टेनमेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार १९८ इतकी आहे.
.......................