८४ हजारांची बिले स्वत:च्या खिशातून भरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:45 AM2018-12-05T05:45:42+5:302018-12-05T05:45:50+5:30
एसटी बँकेच्या संचालकांनी विविध सुविधांसाठी सादर केलेली ८४ हजार रुपयांची खोटी देयके (बिल) नाकारून स्वत:च्या खिशातून भरण्याचे निर्देश स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या प्रशासनाने संचालकांना दिले आहेत.
मुंबई : एसटी बँकेच्या संचालकांनी विविध सुविधांसाठी सादर केलेली ८४ हजार रुपयांची खोटी देयके (बिल) नाकारून स्वत:च्या खिशातून भरण्याचे निर्देश स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या प्रशासनाने संचालकांना दिले आहेत.
एसटी बँकेच्या राज्यात ५० शाखा व सुमारे ९० हजार सभासद आहेत. पेण येथे १६ नोव्हेंंबरला या बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीसाठी नियमानुसार केवळ एक दिवस अगोदर रात्री वास्तव्य करण्याची तरतूद असून, बैठकीच्या दिवसाचा निवासी भत्ता देय आहे. असे असताना बँक संचालकांनी अतिरिक्त एका दिवसाची आलिशान हॉटेलची देयके सादर केली होती. मात्र, या देयकांबाबत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत आनंतपुरे यांनी आक्षेप घेतला व केवळ दोन दिवसांची निवासाची देयके मंजूर केली. याव्यतिरिक्त सादर करण्यात आलेली तब्बल ८४ हजार रुपयांची देयके नामंजूर केली आहेत. या देयकांत दर्शविण्यात आलेली रक्कम बँकेच्या संचालकांना स्वत:च्या खिशातून देण्यास भाग पाडले आहे.
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे एसटी बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असून, बँकेचे कार्याध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हेसुद्धा एसटीमधील वरिष्ठ अधिकारी आहेत. खोटी देयके सादर करून सर्वसामान्य खातेदारांच्या कष्टाच्या रकमेवर डल्ला मारण्याचा हा संचालकांचा प्रयत्न होता. मात्र, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे ही लूट रोखण्यात यश आल्याचे मत एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. केवळ एवढ्यावरच न थांबता यापूर्वी प्रवास व निवासी भत्त्यांपोटी नियमबाह्य देयके सादर करण्याच्या प्रकारांची चौकशी करण्यात येणार असल्याने बँकेला यापुढील काळात आर्थिक शिस्त लागू शकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.