८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन; कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 04:30 AM2019-05-14T04:30:59+5:302019-05-14T04:35:02+5:30
मुंबई : गेल्या पाच महिन्यांत जवळपास तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)ने केली. त्यातील ४५ टक्के ...
मुंबई : गेल्या पाच महिन्यांत जवळपास तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए)ने केली. त्यातील ४५ टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे आढळून आल्याचे धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. तपासणी शिबिरादरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखू सेवन करतात असे आढळून आले. त्यात प्लाकिया, सब म्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी या रोगांचा समावेश आहे.
शहर उपनगरांतील अनेक परिसरांत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यात कुर्ला, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव आणि मालाड अशा विविध परिसरांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये कान, नाक, घसा आणि दातांचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. रिक्षाचालकांना तंबाखू सेवनाची जी सवय लागते, ती अनेक कारणांमुळे लागल्याचे आढळून आले. व्यावसायिक ताणतणाव, भूक मारली जाणे, व्यसने, प्रदूषणाचा त्रास आणि आपल्या कुटुंबापासून आलेले दुरावलेपण या कारणांमुळे तंबाखू सेवनाची सवय रिक्षाचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते, असे निरीक्षण सर्वेक्षणाअंती नोंदविण्यात आले आहे.
या सर्वेक्षणामध्ये तंबाखू सेवनाची कारणे, कर्करोग होण्याचे प्रमाण आणि कर्करोगाची लक्षणे यामध्ये सामायिक दुवा आढळून आला आहे. त्यांच्यामध्ये कर्करोगाचे प्रमुख कारण असलेल्या सवयीबद्दल जागरूकता निर्माण करणे व ती सुटावी म्हणून त्यांच्यात जागृती निर्माण करण्यात येते, अशी माहिती सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी दिली.
ज्या रिक्षाचालकांच्या तोंडामध्ये तंबाखू सेवनामुळे डाग दिसू लागले आहेत त्यांना सीपीएएच्या रोग निदान केंद्रांमध्ये नियमितपणे बोलावून जी तपासणी करणे गरजेचे असेल ती संस्थेमार्फत विनामूल्य केली जाणार आहे.
‘तंबाखूरहित आॅटोरिक्षा’ प्रसारमोहीम घेणार हाती
रिक्षाचालकांना प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. ते कुटुंबापासून खूप काळ दुरावलेलेही असतात आणि त्यामुळे त्यांना तंबाखू सेवनासारखी सवय लागते. ती सुटणे कठीण असते. सीपीएएच्या सहकार्यातून मी स्वत: तंबाखूसेवनाच्या गंभीर सवयीबद्दल रिक्षाचालकांत जागृती व्हावी यासाठी काम करणार आहे. ‘तंबाखूरहित आॅटोरिक्षा’ ही प्रसारमोहीम हाती घेण्यात आली असून, ती यशस्वी व्हावी हेच आमचे लक्ष्य आहे.
- शशांक राव, मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष.